- सदानंद सिरसाटअकोला : बोंडअळीने नुकसान झालेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदत देताना निधीचे समान वाटप तीन टप्प्यात होणार असल्याने पहिल्या टप्प्यात किती शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी जमा होईल, ही बाब हवालदिल शेतकऱ्यांचा अंत पाहणारी ठरणार आहे. अकोला जिल्ह्यात १ लाख ३३ हजार शेतकऱ्यांसाठी पहिल्या टप्प्यात ४५ कोटी १७ लाख २४ हजार रुपये निधी मिळणार आहे. हा निधी वाटप केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातही तेवढाच निधी शासन देणार आहे.बोंडअळीने नुकसान केलेल्या कापूस उत्पादकांना मदत देण्याच्या घोषणेला दोन महिने उलटले, तरी संबंधित जिल्ह्यांना शासनाकडून मदतीचा निधी मिळाला नाही. ही बाब ‘लोकमत’ने सोमवार रोजी अंकात मांडली. त्यानंतर शासनाने मंगळवारी बोंडअळी नुकसानासाठी मदतीचा निधी वाटप करण्यास मंजुरी दिली. त्यानुसार राज्यासाठी आवश्यक ३ हजार चारशे चौºयाऐंशी कोटी ६१ लाख २५ हजार रुपये निधी तीन समान टप्प्यात वाटपाचे आदेशात म्हटले. अकोला जिल्ह्यातील शेतकºयांना मदत देण्यासाठी आवश्यक असलेल्या १३५ कोटी ५१ लाख ७४ हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यात मिळणार आहे. पहिला हप्त्यानुसार ४५ कोटी १७ लाख २४ हजार ६६६ रुपये मिळतील. ही रक्कम १ लाख ३३ हजार ६६८ शेतकºयांना वाटप करताना जिल्हा प्रशासनाची कसरत होणार आहे. या रकमेतून जेवढ्या शेतकऱ्यांना वाटप केली, त्या लाभार्थींची यादी रकमेच्या माहितीसह जिल्हाधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर पुढील हप्त्याची मागणी शासनाकडे करावी लागणार आहे.
वाटपाच्या गोंधळातच जाणार पेरणीची वेळ!शासनाकडून निधी देताना तीन टप्पे पाडल्याने एकूण लाभार्थी संख्येच्या एक तृतीयांश एवढ्याच शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात मदतीची रक्कम मिळणार आहे. ती वाटप होईपर्यंत पेरणीची वेळ निघून जाण्याची शक्यता आहे.