अकोला : शेतकऱ्यांचे ‘टेन्शन’ वाढविणाऱ्या बोंडअळीची जिल्ह्यात ‘एन्ट्री’ झाली असून, शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील अकोला, बाळापूर, बार्शीटाकळी व अकोट तालुक्यात कपाशी पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. बोंडअळीला रोखण्यासाठी कृषी विभागाने धडक मोहीम सुरू केली असून, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. कपाशीच्या बहरलेल्या पिकावर बोंड पोखरून खाणाऱ्या या गुलाबी अळीचा पुन्हा एकदा प्रकोप झाल्याने शेतकरी हादरले आहेत. बोंडअळीची उपाययोजना न केल्यास आगामी २० दिवसात प्रकोप वाढण्याची भीती शास्त्रज्ञांनी वर्तविली आहे.
गतवर्षीही गुलाबी बोंडअळीचे आक्रमण झाले होते, परंतू त्याचे प्रमाण कमी होते. यंदा कापसाचे पीक फुले-पातीवरच असताना बोंडअळीचा शिरकाव दिसून आला आहे. जिल्ह्यात १ लाख २४ हजार ९९८ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी आटोपली आहे. शेतकऱ्यांना यंदा चांगल्या उत्पादनाची आशा असतानाच जिल्ह्यात काही भागात बोंडअळीचा प्रकोप झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. बोंडअळीला रोखण्यासाठी कृषी विभागामार्फत भेटी दिल्या जात असून, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. पावसाने दडी मारल्याने आधीच चिंतेत सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर बोंडअळीचे संकट उभे राहिले आहे.जिल्ह्यात बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. ज्या भागात बोंडअळी दिसून येत आहे, त्या भागात कृषी विभागाकडून पाहणी करण्यात येत आहे. बाळापूर तालुक्यातील खिरपूरी बु. परिसरात बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ, तसेच कृषी विभागाने केलेल्या शिफारशींचा अवलंब करावा.- शंकर किरवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अकोला.