अकोला, दि. १0- रेल्वे स्टेशन परिसरातील अकोट फैल पुलानजीक रेल्वे रुळावर एका रेल्वे इंजीनमधील अग्निरोधक यंत्र काढून फेकल्याने तपास यंत्रणांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती. या घटनेला तीन दिवसांचा कालावधी होत नाही तोच बॉम्ब शोधक आणि नाशक पथक तसेच श्वान पथकाद्वारे शुक्रवारी सायंकाळी रेल्वे स्टेशन परिसरात तपासणी करण्यात आली. यावेळी रामदास पेठ पोलिसांद्वारेही स्टेशन परिसरातील वाहनतळ आणि रेल्वे रुळावर झडती घेण्यात आली.रेल्वे स्टेशन परिसर तसेच वाहनतळ आणि रेल्वे रुळावरून अनुचित घटना घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने बॉम्ब शोधक व नाशक पथक, रामदास पेठ पोलीस आणि श्वान पथकाद्वारे तब्बल तीन तास झाडाझडती घेण्यात आली. वाहन तळावरील सुमारे ५00 वर दुचाक्यांची तपासणी केल्यानंतर रेल्वे रुळावर अकोट फैल पुलापर्यंत तसेच न्यू तापडिया नगर परिसरातील रेल्वे रुळावर ही तपासणी करण्यात आली. रेल्वे रुळाची सूक्ष्मरीत्या तपासणी करीत काही साहित्य तसेच वस्तू ठेवण्यात आली का, याचीही तपासणी बॉम्ब शोधक व नाशक पथकाने केली. रेल्वे स्टेशनवरील पायर्यांखाली श्वान पथकाद्वारे कसून तपासणी केल्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या यंत्राद्वारे या ठिकाणी झडती घेण्यात आली. लखनऊ येथे एका दहशतवाद्याचा खात्मा केल्यानंतर तपास यंत्रणा कामाला लागल्या असून, याच पृष्ठभूमीवर अकोल्यातील पोलीस यंत्रणेद्वारे रेल्वे स्टेशन परिसर तसेच रेल्वे रुळावर झाडाझडती घेण्यात आली. रामदास पेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश सावकार यांनी रेल्वे स्टेशनसमोरील चौक ते वाहनतळ, रेल्वे स्टेशन परिसर आणि रुळावर तपासणी करण्यासाठी बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला आवश्यक त्या सूचना केल्या. रेल्वे रुळावरील काही संशयास्पद वस्तू तसेच कापडही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.बॉम्ब शोधक व नाशक पथक, श्वान पथक आणि रामदास पेठ पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी ही तपासणी केली. रेल्वे स्टेशन परिसर, फलाट क्रमांक, वाहनतळ आणि रेल्वे रुळासह परिसरातील विविध कानाकोपर्यात ही तपासणी करण्यात आली. रेल्वे स्टेशनवर गत काही दिवसांपूर्वी घडलेल्या प्रकारानंतर ही तपासणी करण्यात आली आहे.- प्रकाश सावकारपोलीस निरीक्षक, रामदास पेठ पोलीस स्टेशन, अकोला.
बॉम्ब शोधक-नाशक पथकाकडून रेल्वे स्टेशनवर तपासणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2017 2:13 AM