राजरत्न सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कपाशीवरील गुलाबी बोंडअळीला प्रतिबंध घालणारी परोपजीवी मित्र कीटक (ट्रायकोग्रामा) वाढविण्यावर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने भर दिला असून, या मित्र कीटकाची प्रयोगशाळेत निर्मिती व संवर्धन केले जात आहे. शेतकर्यांनी समूहाने कपाशीवर वापर केल्यास तिन्ही प्रकारच्या बोंडअळ्यांवर नियंत्रण मिळविता येईल, तसेच रासायनिक कीटकनाशकांचा वाढलेला अनावश्यक खर्च टाळता येईल, असा दावा कृषी शास्त्रज्ञांनी केला आहे. कापूस हे नगदी पीक आहे; पण या पिकाचे सर्वाधिक नुकसान बोंडअळी प्रजातीची कीड करीत असते. बोंडअळीला प्रतिबंधक रासायनिक कीटकनाशकांच्या फवारण्या करू नही ही कीड आटोक्यात येत नसल्याने दीड दशकापूर्वी एका विदेशी कंपनीने बोंडअळीला प्रतिबंधक जनुक टाकून बीटी कापूस तंत्रज्ञान भारतीय बाजारात आणले. या बीटीने बघता-बघता संपूर्ण देश व्यापून अख्ख्या बियाणे बाजारावर कब्जा केला; पण अलीकडच्या दोन ते तीन वर्षांत बीटी कपाशीवर बोंडअळीच्या प्रतिकारक्षम पिढय़ा तयार झाल्या असून, बीटी कपाशीवरही त्यांनी हल्ला केला आहे. या अळीच्या वाढलेल्या प्रादुर्भावामुळे पंजाब, हरियाणासारख्या कापूस उत्पादक राज्यातील बीटी कापसावर गुलाबी बोंडअळ्यांनी आक्रमण केले. त्यामुळे तेथील शेतकर्यांनी बीटी कापसाची पेरणी कमी केली. या सर्व पृष्ठभूमीवर अकोल्याच्या कृषी विद्यापीठाने गुलाबी बोंडअळीला प्रभावी प्रतिबंधक (ट्रायकोग्रामा) परोपजीवी मित्र कीटकाच्या निर्मिती व संवर्धनावर भर दिला आहे. या मित्र कीटकाचा वापर केल्यास गुलाबी, अमेरिकन आणि ठिपक्यांच्या बोंडअळीवर नियंत्रण मिळवता येते, हे विशेष. त्यासाठी मात्र हंगामाच्या सुरुवातीपासून, गावपाळीवर अवलंब करावा लागणार आहे.
मित्र कीटकांचे संवर्धन!तांदळातील अळीच्या पंतगांची अंडी गोळा करू न या अंड्यांच्या नर-माधीचे प्रयोगशाळेत संगोपन केले जात आहे. संगोपन केलेली अंडी एका पिवळ्या जाड्या कागदावर चिकटवून तो पिवळा कागद कापसाच्या फांदीला बांधला जातो. या कागदावरील अंड्यातून सात ते आठ दिवसांनतंर ट्रायकोग्रामा बाहेर येतात, तसेच कापसावरील बोंडअळीतील अंड्यांचा शोध घेतात. कापूस असलेल्या बोंडात शिरू न कापसाचे कोणतेही नुकसान न होऊ देता गुलाबी बोंडअळय़ांना फस्त करते. विशेष म्हणजे, हे तंत्रज्ञान एका एकारावर वापरण्यासाठी शेतकर्यांना फक्त १00 रुपये खर्च येतो. एका पिवळ्या कागदाच्या पट्टीवर वीस भाग असतात. एका भागावर जवळपास २,५00 अंडी ठेवली जातात. त्यामुळे शेतकर्यांचा खर्च वाचतो व पिक ाचे संरक्षण होते.
ट्रायकोग्रामा ही एक पर्यावरणपूरक व बिनविषारी मित्र कीटकांचा प्रकार आहे. कपाशीवरील बोंडअळीचे प्रभावी नियंत्रण करते आणि खर्चही कमी लागतो. शेतकर्यांनी हंगामाच्या सुरुवातीला याचा वावर करावा, शेतकर्यांच्या मागणीनुसार कृषी विद्यापीठालाही हे तंत्रज्ञान देता येईल.- डॉ.डी.बी. उंदीरवाडे, विभाग प्रमुख,