अकोला: देशासह राज्यातील काही भागात कोविडचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. काही भागात कोविडमुळे मृत्यू झाल्याचेही समोर आले असून ज्येषठांमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याची माहिती आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून लसीचा बुस्टर डोस पुन्हा देण्याचा निर्णय घेतला आहे. मोहिमेंतर्गत ज्येष्ठांना प्राधान्य दिले जाणार असून १८ वर्षांवरील सर्वच यासाठी पात्र ठरणार असल्याची माहिती आहे.
हा बुस्टर डोस नाकावाटे घेतल्या जाणाऱ्या इन्कोव्हॅक लसीचा असणार आहे. यासंदर्भात स्थानिक आरोग्य यंत्रणेला मार्गदर्शक सुचना प्राप्त झाल्या आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडची स्थिती नियंत्रणात असली, तरी राज्यातील इतर भागात कोविड वाढताना दिसून येत आहे. कोविडचा संभाव्य धोका लक्षात घेता आरोग्य यंत्रणेमार्फत सतर्कता म्हणून पुन्हा लसीकरणावर भर दिला जाणार आहे. मात्र, यंदा नाकावाटे दिली जाणारी ‘इनोव्हॅक’ लस उपयोगात आणली जाणार असून प्रिकॉशन म्हणून ज्येष्ठांना बुस्टर डोस दिला जाणार आहे. याशिवाय, १८ वर्षांवरील सर्वच नागरिक लसीसाठी पात्र ठरणार आहेत. यासंदर्भात १८ एप्रिल रोजी आरोग्य सेवा आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत राज्य शासनामार्फत कोविड १९ लसीकरण कार्यक्रमांतर्गत नाकावाटे घ्यावयाचा इन्कोव्हॅक लसीची खरेदी करून जिल्हा व महापालिका आरोग्य यंत्रणेला वितरीत करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
पहिल्या अन् दुसऱ्या डोससाठी ‘इन्कोव्हॅक’नाकावाटे दिली जाणारी इन्कोव्हॅक ही लस केवळ बुस्टरसाठीच नाही, तर पहिल्या आणि दुसरा डोस घेणाऱ्यांसाठीही राहणार आहे. त्यामुळे ज्यांनी अद्याप लसीचा एकही डोस घेतला नाही, अशांना ही लस चालणार आहे. याशिवाय ज्यांचा दुसरा डोस घेणे बाकी आहे, अशा नागरिकांनाही इन्कोव्हॅक्स लस दिली जाणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
इन्कोव्हॅक लसीसंदर्भात मार्गदर्शक सुचना प्राप्त झाल्या आहेत. मात्र, ही मोहीम कधीपासून राबविली जाईल, ही नाकावाटे घेतली जाणारी लस कधी प्राप्त होईल या विषयी अद्याप सुचना प्राप्त झाल्या नाहीत.
- डॉ. विनोद करंजीकर, जिल्हा लसीकरण अधिकारी, अकोला