लोकमत न्यूज नेटवर्कबोरगाव मंजू : महामार्गावर न्यायालयाच्या आदेशाने बंद झालेले दुकान महिला व ग्रामस्थांच्या विरोधानंतरही सुरू करण्याचा प्रयत्न झाल्याने संतप्त झालेल्या लक्ष्मी नगरातील महिलांनी शनिवारी हे दुकानच फोडून टाकले. गावातील बसस्थानकाजवळील देशी दारूचे दुकान १ एप्रिलपासून बंद होते. हे देशी दारूचे दुकान नव्याने स्थानांतरित करण्यासाठी हालचाल सुरू झाली होती. श्रीसंत गजानन महाराज मंदिर, शाळा व वस्ती परिसरात दुकान स्थानांतरित होत असल्याचे लक्षात येताच गत दीड महिन्यापूर्वी ग्रामस्थांसह महिलांनी प्रशासनाला निवेदन देऊन लक्ष्मी नगर परिसरात देशी दारूचे दुकान सुरू करू नये, अशी मागणी केली होती; परंतु संबंधितांनी महिलांसह ग्रामस्थांच्या निवेदनाची दखल न घेता सदर देशी दारू दुकानाला लक्ष्मी नगरात परवानगी दिली. दरम्यान, सदर दुकान सुरू करण्याकरिता दारूसाठा शुक्रवारी दुकानात भरण्यात आला. याची चाहूल महिलांना आज शनिवारी सकाळी लागताच महिला संतप्त झाल्या व दुकानावर महिलांनी एकत्र होऊन हल्ला चढविला. दुकानातील देशी दारूच्या बॉक्सह बाटल्यांची तोडफोड केली. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार पी. के. काटकरसह पोलिसांनी धाव घेतली व संतप्त महिलांना शांत केले.
बोरगाव मंजूत महिलांनी फोडले देशी दारूचे दुकान
By admin | Published: June 18, 2017 2:21 AM