बोरगाव मंजू, दि. १४- येथील नवदुर्गा विसर्जनादरम्यान मंडळाच्या कार्यकर्त्यांवर लाठीमारप्रकरणी बोरगाव मंजूचे ठाणेदार भाष्कर तंवर यांची उपविभागीय पोलीस अधिकार्यांकडून चौकशी सुरू झाली असून, पीएसआय पाटील यांना तडकाफडकी मुख्यालयी रवाना करण्यात आले आहे. बोरगाव मंजू येथे नवदुर्गा विसर्जनादरम्यान मंडळाच्या एका कार्यकर्त्याला पोलिसांनी मारहाण केली होती. त्यावेळी मारहाण करणार्या पोलिसावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांंनी विसर्जन मिरवणूक थांबविली होती. त्यानंतर अकोला शहरातून आलेल्या रॅपिड अँक्शन फोर्सच्या जवानांनी मिळेल त्याला अमानुषपणे मारहाण केली होती. यामध्ये १0 लोकांना गंभीर इजा झाली आहे. याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी १४ ऑक्टोबर रोजी पीएसआय जयसिंग पाटील यांची तडकाफडकी मुख्यालयी बदली केली आहे. तसेच रॅपिड अँक्शन फोर्सच्या जवानांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. बोरगाव मंजूचे ठाणेदार भाष्कर तंवर यांची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी कल्पना भराडे यांनी सुरू केली आहे. नागरीकांना बेदम मारहाण करणार्या पोलिसांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जि. प. सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी केली आहे.
बोरगाव मंजू ठाणेदार तंवर यांची चौकशी सुरू!
By admin | Published: October 15, 2016 3:22 AM