बोरगाव मंजू (अकोला): महान धरणातील जलसाठय़ात झालेली घट व स्थानिक प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराने बोरगाव मंजू येथील ग्रामस्थांना ऐन हिवाळय़ात पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत. गत १५ दिवसांपासून गावाचा पाणीपुरवठा बंद असल्यामुळे गावकर्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.बोरगाव मंजूसह परिसरातील ६४ गावांना खांबोरा योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. परंतु, महान धरणातील जलसाठा कमी झाल्याने तो अकोला शहरासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे महान धरणातून खांबोरा योजनेसाठी सोडले जाणारे पाणी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे या ६४ गावांना आता दगडपारवा धरणातील मृत साठा, दोनदचा डोह व सुकळी नंदापूर येथील कूपनलिका या ठिकाणांहून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाण्याचे हे स्रोत र्मयादित असल्यामुळे या ६४ गावांना पाणीपुरवठा करताना प्रशासनाची चांगलीच दमछाक होत आहे. बोरगाव मंजूसह ६४ गावांना १५ ते २0 दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. अशातच गावातील हातपंप नादुरुस्त असल्यामुळे गावकर्यांना पाण्यासाठी दोन किमीपर्यंत पायपीट करून पाणी आणावे लागत आहे. लोकांवर ऐन हिवाळय़ात पाणी विकत घेण्याची पाळी आली आहे.
बोरगाव मंजूत तीव्र पाणीटंचाई
By admin | Published: November 10, 2014 1:09 AM