अकोला: इस्टेट ब्रोकरचे दहा लाख रुपयांसाठी अपहरण करणाऱ्या दोन्ही आरोपींना रविवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले. तर पैसे स्वीकारणाऱ्याला पोलिसांनी सोडून दिले असल्याचे बोलल्या जात आहे.इस्टेट ब्रोकर उमेश कन्हैयालाल राठी यांच्याकडून शेख जमील शेख अमीर यास दहा लाख रुपये घ्यायचे होते; परंतु राठी हे त्यास पैसे देण्यासाठी वारंवार टाळत होते. शेवटी शेख जमील व राजेश शर्मा याने मिळून राठी यांचे अपहरण करून त्यांना मंगरूळपीर-कारंजा रोडवर नेले होते. तेथून या दोघांनीही राठीच्या घरी फोन करून दहा लाख रुपये आणण्याचे राठी यांच्यानातेवाइकांना सांगितले. राठी यांच्या नातेवाइकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी त्यांचे मोबाइल लोकेशन काढले. त्या महिलांनी पैसे तयार असल्याचे सांगून कुठे द्यायचे, असे विचारले. ते पैसे घेऊन नियोजित ठिकाणी गेले असता सापळा रचून बसलेल्या पोलिसांनी शेख आसिफ याला पकडले. त्यानंतर राठीला घेऊन शेख जमील परत आल्यानंतर पोलिसांनी त्यालाही अटक केली. तसेच राजेश शर्मालाही अटक केली. शेख आसिफ याला रात्रीच सोडल्याची चर्चा आहे. खदान पोलिसांनी दोघांनाही न्यायालयात हजर केले असता त्यांची कारागृहात रवानगी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
अपहरण करणाऱ्या दोघांची कारागृहात रवानगी
By admin | Published: May 01, 2017 3:13 AM