अकोला -खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नगर परिषद कॉलनीतील रहिवासी डंबेलकर तसेच सिंधी कॅम्प परिसरातील पक्की खोली येथील रहिवासी परळीकर या दोन ठिकाणी झालेल्या चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी नदीम बेग कलीम बेग आणि अ. रिजवान अब्दुल खालीद यांच्या पोलिस कोठडीची मुदत मंगळवारी संपली. दोघांनाही मंगळवारी न्यायालयात हतर केले असता न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. तसेच आणखी तीन फरार आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत.नगर परिषद कॉलनीत प्रशांत वसंतराव डंबेलकर व खालच्या मजल्यावरील त्यांच्या भावाच्या घरासह शैलेश अक्षय मिश्रा या दोन घरांमध्ये चोरट्यांनी हैदोस घालत सहा लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. यापूर्वी कच्ची खोली येथील रहिवासी परळीकर यांच्याही निवासस्थानी चोरी करण्यात आली होती. चोरट्यांनी देवघरातील देवीच्या सोन्या व चांदीच्या मूतीर्ही लंपास केल्या होत्या. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केल्यानंतर खदान पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास ठाणेदार उत्तमराव जाधव यांनी केल्यानंतर सोनटक्के प्लॉट येथील रहिवासी नदीम बेग कलीम बेग आणि अब्दुल रिजवान अब्दुल अकील या दोघांना अटक केली. या दोन चोरट्यांचे साथीदार फरार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या दोन चोरट्यांनी दोन्ही चोऱ्यांची कबुली दिली एका घटनेतील सोने पोलिसांना दिले आहे.