अकोट : अकोट शहरात घरफोडी करणाऱ्या दोघांना शहर पोलिसांनी ९ एप्रिल रोजी अटक केली. त्यांच्याकडून चोरी गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींना न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अटक केलेल्या चोरट्यांकडून अधिकही चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. स्थानिक सरस्वती नगर येथील अतुल उत्तमराव शेंडे यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी १८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. ही घटना ६ एप्रिल रोजी उघडकीस आली होती. याप्रकरणी तपास सुरू असताना गुप्त माहितीवरून विकास नगर येथील शरद अशोक सहारे (२४), फरकाडे नगर येथील निखील माणिकराव मेंढे (२०) या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांना अधिक विचारपूस केली असता, त्यांनी चोरीची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरून नेलेले मॉनिटर, सीपीयू, गॅस सिलिंडर, शेगडी, प्रिंटर व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. आरोपींजवळून अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पाहता त्यांना न्यायालयात पोलीस कोठडीकरिता हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने आरोपी शरद सहारे व निखील मेंढे या दोघांना ११ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, उपविभागीय पोलीस अधिकारी मनवर, अकोट शहर पोलीस निरीक्षक सी.टी. इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाचे हे.काँ. उमेश सोळंके, संतोष सुरवाडे, जितेंद्र कातखेडे, प्रवीण कांबळे, मंगेश खेडकर यांनी केली. अकोट शहरात गत काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चोऱ्या झालेल्या आहेत. पोलिसांनी मुद्देमालासह दोन चोरट्यांना अटक केली असून, अजूनही काही चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे.