- राजेश शेगोकार
अकोला : सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून राजकारणात ‘अकोला पॅटर्न’ निर्माण करून प्रस्थापित राजकीय पक्षांना पर्याय देणाऱ्या अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जवळपास प्रत्येक निवडणुकीत नवा प्रयोग केला. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी त्यांनी ‘एमआयएम’सोबत आघाडी जाहीर करताच काँग्रेसने आंबेडकरांचे मन वळविण्यास सुरुवात केली. यादरम्यान आंबेडकरांनी काँग्रेस चालेल; पण राष्टÑवादी नाही, असा पवित्रा घेत थेट शरद पवारांवरच निशाणा साधला होता. त्यामुळे काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेस आघाडीमध्ये आंबेडकरांचा समावेश होण्याची शक्यता धूसर असतानाच आता माजी उपमुख्यमंत्री व राष्टÑवादीचे नेते अजित पवार यांनी आंबेडकर आघाडीत आले, तर स्वागतच आहे, अशी भूमिका घेतल्याने दोन्ही काँग्रेस आंबेडकरांना सोबत घेण्यास अनुकूल असल्याचे स्पष्ट झाले आहे.भाजपाचा झंझावात थांबविण्यासाठी काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेसने मित्रपक्षांना सोबत घेऊन आघाडीचे संकेत यापूर्वीच दिले होते. या आघाडीमध्ये अॅड. प्रकाश आंबेडकरांच्या भारिप-बमसंचाही सहभाग असावा, अशी चर्चा काँग्रेसच्या गोटात सुरू असताच अॅड. आंबेडकरांनी धनगर, ओबीसी, मुस्लीम अशा वंचित जातीतील उमेदवारांना एकत्र घेऊन आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याचा मानस व्यक्त करून या उमेदवारांना न्याय देण्यासाठी जो पुरोगामी पक्ष आम्हाला १० जागा देईल, त्यांच्याशी युती केली जाईल, अशी भूमिका स्पष्ट केली व तसा प्रस्ताव काँग्रेसला दिला. या प्रस्तावावर काँग्रेसकडून कुठलेही उत्तर भारिप-बमसंला मिळाले नाही. दरम्यानच्या काळात अॅड. आंबेडकरांनी ‘एमआयएम’सोबत मैत्री जाहीर करून या मैत्रीचा नारळ गांधी जयंतीला औरंगाबाद येथे फोडला. भारिप-बमसं व एमआयएम या मैत्रीमुळे धर्मनिरपेक्ष मतांमध्ये मोठे विभाजन घडेल, या भीतीने काँग्रेसने अॅड. आंबेडकरांशी बोलणी सुरू केली. या बोलणीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनीही पुढाकार घेत भाजपाविरोधात एकत्र येण्याची गळ आंबेडकरांना घातली. या सर्व घडामोडी सुरू असताना अॅड. आंबेडकर मात्र राष्टÑवादीवर आरोपांची झोड उठवित होते. काँग्रेससोबत आघाडी चालेल; मात्र राष्टÑवादी नाही, अशी भूमिका घेत राष्टÑवादी जातीयवादी आहे, अशी टीका केली होती.त्या टीकेला थेट शरद पवारांनी उत्तर देत आंबेडकरांच्या निवडणुकीतील विजयाचे दाखले दिले होते. या सर्व प्रकारामुळे अॅड. आंबेडकरांचा काँग्रेस आघाडीत समावेश होण्याची शक्यता धूसर असतानाच आता अजित पवारांनी आंबेडकरांच्या वक्त व्याचा त्यांच्या समावेशावर परिणाम होणार नाही, असे स्पष्ट केल्याने भारिप-बमसं काँग्रेस आघाडी होण्याची शक्यता बळावली आहे. दरम्यान, काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेस जागा वाटपाच्या बोलणीमध्ये अकोल्याची जागा मित्रपक्षांना सोडण्याची तयारी दोन्ही काँग्रेसने दर्शविली असल्यामुळे ही जागा अॅड. आंबेडकरांसाठीच असावी, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याने दोन्ही पक्षांच्या इच्छुकांचे धाबे दणाणले आहे.