बुलडाणा : जिल्हा परिषद आरोग्य सेवकाच्या ४0 रिक्त जागांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेदरम्यान मोबाईल फोनने कॉपी करताना रविवारी दोन उमेदवारांना अटक करण्यात आली. प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचे मेसेज मोबाईल फोनने कुणाला तरी पाठवून, त्याची उत्तरं हे दोन्ही उमेदवार मिळवत होते.बुलडाणा जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य सेवकाच्या ४0 जागांसाठी जिल्ह्यातील १0 तालुक्यातील ८५ परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात आली. यासाठी जवळपास २३ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते. परीक्षा दुपारी २ ते ३.३0 वाजताच्या दरम्यान घेण्यात आली. दरम्यान, बुलडाणा येथील श्री शिवाजी हायस्कूल या परीक्षा केंद्रावरील २८ वर्ग खोल्यांमध्ये ६00 परीक्षार्थींसाठी बैठक व्यवस्था करण्यात आली होती; मात्र प्रत्यक्षात ३७७ परीक्षार्थींनी परीक्षा दिली. परीक्षा शांततेत सुरू असताना साखळी बु. येथील प्रदीप भास्कर कोळसे व आकाश वसंता मोरे हे दोन्ही परीक्षार्थी मोबाईल फोनद्वारे मॅसेजची देवाण-घेवाण करून कॉपी करताना मिळून आले. यावेळी परीक्षा वर्गावर असलेले पर्यवेक्षक शिंदे यांनी दोन्ही परीक्षार्थींकडून मोबाईल फोन व उत्तरपत्रिका जप्त करून, याबाबतची माहिती वरिष्ठांना दिली. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कॉपीच्या या प्रकाराबाबतचा अहवाल वरिष्ठांना सादर करण्याचे आदेश दिले. *पॅन्टचा खिसा कापून मोबाईल लपविलापरीक्षार्थींंची तपासणी होत असल्यामुळे कॉपीबहाद्दरांनी मोबाईल लपविण्यासाठी शक्कल लढविली. कॉपीबहाद्दरांनी पॅँटमध्ये मोठा खिसा तयार केला. या खिशात त्यांनी मोबाईल फोन लपवून परिक्षा केंद्रात प्रवेश केला. इतर परीक्षार्थींनी आपले मोबाईल फोन बंद करून बाहेर ठेवले होते. *एका परीक्षार्थीच्या तक्रारीमुळे प्रकार उघडशिवाजी हायस्कूलच्या परीक्षा केंद्रावरील वर्ग क्रमांक २४ मधील एका परीक्षार्थीने समन्वयक व केंद्र प्रमुखांकडे तक्रार केली होती. आम्ही दिवस-रात्र अभ्यास करतो; परंतु काही विद्यार्थी मोबाईल फोनद्वारे कॉपी करीत आहेत. याची तक्रार वरिष्ठांकडे, तसेच प्रसार माध्यमांकडे करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.
मोबाईल फोनवरून कॉपी करताना दोघांना अटक
By admin | Published: November 30, 2014 10:20 PM