खामगाव (बुलडाणा): अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिच्यावर मातृत्व लादणार्या दोन आरोपींना खामगाव न्यायालयाने शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. खामगाव शहरातील रावण टेकडी भागात साडेतेरा वर्षाची मुलगी काका व आजीसोबत राहत होती. आरोपी व मुलीचे काका हे वाजंत्री वाजविण्याचे काम करीत होते. १२ ऑगस्ट २0१३ रोजी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार, जवळपास वर्षभरापुर्वी एक दिवस मुलीचे काका जास्त दारू प्यायले होते. त्याचा फायदा घेत संग्रामपूर तालुक्यातील कुंदेगाव कोद्री येथील आरोपी राजू सुखदेव वाकोडे (वय ३४) आणि गणेश गुलाब वानखडे (वय ४६) यांनी पीडित मुलीवर अत्याचार केला. काही दिवस हा प्रकार सुरूच होता. त्यामुळे मुलगी गर्भवती राहिली. तिने आजीला याबाबत माहिती दिली. त्यानंतर खामगाव येथे १२ ऑगस्ट २0१३ रोजी या प्रकरणाची तक्रार देण्यात आली. या तक्रारीवरून दोन्ही आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल केल्यानंतर दोन्ही आरोपींना अटक केली होती. तेव्हापासून आजपर्यंत दोन्ही आरोपी तुरूंगातच होते. सरकारी पक्षातर्फे एकूण ८ साक्षीदार तपासण्यात आले. डीएनए चाचणीमध्ये राजु वाकोडेपासून मुलीला गर्भ राहिल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात माजी सरकारी वकील राजेश्वरी आळशी यांनी तसेच अतिरिक्त सरकारी वकील जे.एम. बोदडे यांनी काम पाहिले. त्यांना सहाय्य सरकारी वकील उदय आपटे यांनी सहकार्य केले. शुक्रवारी खामगाव येथील जिल्हा सत्र न्यायाधीश एम.एम. अग्रवाल यांनी दोन्ही आरोपींना भादंवि कलम ३७६ अन्वये जन्मठेप, ५ हजार रूपये दंड, दंड न भरल्यास आणखी १ वर्षे सक्तमजुरी, त्याचप्रमाणे लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम कायद्याअंतर्गतही जन्मठेप, ५ हजार रूपये दंड, दंड न भरल्यास १ वर्षे सक्तमजुरी, तर भादंवि कलम ३२३, ५0६ अन्वये १ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
बलात्कार प्रकरणी दोघांना जन्मठेप
By admin | Published: January 09, 2016 2:40 AM