या शहरात शुक्रवार व मंगळवार असे दोन दिवस अनुक्रमे जुनी वस्ती व स्टेशन विभाग अशा दोन भागांकरिता दोन आठवडी बाजार भरतात. दोन्ही बाजारांमध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी असते. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ही गर्दी कोरोना संक्रमणाला गतिमान करू शकते, ही भीती लक्षात घेऊन उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांनी हे दोन्ही आठवडी बाजार बंद ठेवण्याचा आदेश निर्गमित केला असून, बाजारात माल घेऊन येणाऱ्या व्यापाऱ्यांचा माल जप्त करून दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देऊन व्यापारी, नागरिक, ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
कोरोनावर मात करण्यासाठीच्या त्रिसूत्रीचे उल्लंघन करून मास्क न वापरणाऱ्या ७० जणांवर दंडात्मक कारवाई करून महसूल, पोलीस व पालिका प्रशासनाच्या पथकांनी मुख्याधिकारी विजय लोहकरे यांच्या मार्गदर्शनात १४ हजार रुपये दंड वसूल केला.