अकोला: आदर्श कॉलनीतील बालसुधारगृहातून गत आठवड्यात पसार झालेल्या दोन अल्पवयीन मुलांपैकी एका मुलास वरोरा पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. त्याच्या गुन्ह्याची माहिती वरोरा पोलिसांनी खदान पोलिसांना सोमवारी दिली. बालसुधारगृहातून आठ दिवसांपासून दोन अल्पवयीन बालगुन्हेगार पळून गेलेले होते. त्या दोघांचाही शोध खदान पोलीस तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या मुस्कान पथकात काम करणाऱ्या पथकाकडून घेण्यात येत होता. यामधील एक अल्पवयीन मुलास वरोरा पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी केली असता त्याने अकोला येथील बालसुधारगृहातून पळून आल्याचे वरोरा पोलिसांना सांगितले. त्यानुसार वरोरा पोलिसांनी खदान पोलिसांशी संपर्क साधून यासंदर्भात माहिती दिली आहे. खदान पोलीस त्याच्या गुन्ह्यांसंदर्भात वरोरा पोलिसांना पत्राद्वारे कळविणार असल्याची माहिती खदानचे ठाणेदार पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी दिली.
बालसुधारगृहातून पसार झालेला मुलगा चोरी प्रकरणात अटक
By admin | Published: July 11, 2017 1:06 AM