मूर्तिजापूर: ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या धोत्रा शिंदे येथे प्रियकराने विधवा प्रेयसीची चाकूने वार करून हत्या केली. ही घटना सोमवारी संध्याकाळी ६.३० वाजता धोत्रा शिंदे येथील बस थांब्यावर घडली. सविता अंकुश दुधे असे मृतक महिलेचे नाव आहे. आर्थिक व्यवहारातून ही हत्या झाल्याचा अंदाज वर्तवला आहे.धोत्रा शिंदे येथील सविता अंकुश दुधे (३२) हिच्या पतीचे दोन वर्षापूर्वी अपघातात निधन झाले. त्यामुळे ती आपल्या दोन चिमुकल्यांसह धोत्रा शिंदे येथे राहत होती. पतीच्या निधनानंतर तिचे गावातील धनराज प्रल्हाद साठे (२५) याच्या सोबत अनैतिक संबंध जुळून आले. सदर महिलेला जीवन विमा निगम कडून पतीच्या निधनानंतर मोठी रक्कम मिळाली. या रकमेवर धनराज याची नजर होती. त्या रकमेतून काही हिश्शाची मागणी धनराज वारंवार करत असे; परंतु सविता हिने त्यातील रक्कम देण्यास साफ नकार दिला होता. या पैशाच्या वादातूनच आरोपी धनराजने सविताची चाकूचे वार करून हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.सविता ही मूर्तिजापूर येथील आपली कामे आटोपून आपल्या गावी धोत्रा शिंदे येथे आॅटोरिक्षाने सोमवारी संध्याकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान परत गेली; परंतु तिला कुठल्याही गोष्टीची कुणकुण न लागू देता पूर्वीपासूनच बसथांब्यावर दबा धरून बसलेल्या आरोपी धनराज याने अॅटोतून उतरलेल्या सवितावर चाकूचे सपासप वार केले. पहिला वार गळ्यावर जोरदार झाल्याने सविता रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी आरोपी धनराज साठेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी कल्पना भराडे व ठाणेदार रिता उईके यांच्या मार्गदर्शनाखाली मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)अनाथ झाले बंटी, बबलूदोन वर्षांपूर्वी वडिलांचे अपघातात निधन झाल्याने वडिलांचे छत्र हरविल्या गेले. त्यानंतर बंटी ६ वर्ष व बबलू ३ वर्ष ही दोन चिमुकली आईच्या कुशीत वाढली. आजच्या या घटनेने दोन्ही चिमुकले पोरकी झाल्याने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या पुढे या दोन चिमुकल्यांचा सांभाळ क रायचा कोणी, हाच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.