अकोला: पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राज्यात पहिल्यांदाच होत असलेल्या मेगा भरतीतून सर्वच विषय शिक्षकांची पदभरती टीईटी व अभियोग्यता चाचणीच्या माध्यमातून होत आहे. अभियोग्यता परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांनी निवडलेल्या शाळांमधून प्राप्त गुणांच्या आधारे मुलाखतीतून ही भरती होणार आहे; मात्र या भरतीत शारीरिक शिक्षण शिक्षकांची पदभरती वादात सापडली आहे.डिसेंबर २०१७ मध्ये झालेल्या अभियोग्यता चाचणी परीक्षेसाठी ज्यावेळी आवेदन पत्र मागविली गेली, त्यावेळी माहिती भरताना बीपीएड अर्हताधारकांसाठी टॅब ओपन होत नसल्याने अनेकांचे फॉर्म भरले गेले नाहीत. शासनातर्फे शेवटच्या टप्यात बीपीएडसाठी टॅब उपलब्ध करू न देण्यात आली होती. त्यामुळे सुरुवातीच्या काळात परीक्षेसाठी ज्यांनी फॉर्म भरण्याचा प्रयत्न केला, अशा राज्यातील किमान ८५ ते ९० टक्के बीपीएडधारक टीईटी परीक्षेपासून वंचित राहिले.शासनातर्फे होत असलेल्या मेगा भरतीसाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्यांनाच शिक्षक भरतीसाठी पात्र ठरविण्यात येणार असल्याने राज्यातील किमान ८५ ते ९० टक्के बीपीएडधारक या प्रक्रियेपासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे शारीरिक शिक्षण शिक्षक भरती प्रक्रियेतून दूर राहणार असल्या कारणाने या बीपीएडधारकांवर अन्याय होत आहे. शासनाच्या डिसेंबर २०१४ परिपत्रकान्वये आठवीपर्यंत कला क्रीडा व संगीत विषयासाठी टीईटी परीक्षा देणे गरजेचे नाही, असे उल्लेखित आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना उच्च प्राथमिक व माध्यमिक स्तर रचनेतील बदल लक्षात न आल्याने, टीईटीची गरज नाही, अशी संभ्रमावस्था निर्माण झाल्याने व सुरुवातीला आॅनलाइन फॉर्म भरल्या जात नसल्याने अभियोग्यता चाचणीपासून वंचित राहावे लागले. त्यामुळे एकप्रकारे बीपीएडधारकांची फसवणूक झाली आहे. या बीपीएडधारकांना योग्य तो न्याय मिळावा, यासाठी वंचित बीपीएडधारकांमार्फत शिक्षणाधिकारी, शिक्षण संचालक, शिक्षणमंत्री, शिक्षण सचिव यांना निवेदन देऊन संबंधित गोष्टीचे गांभीर्य लक्षात आणून देणार आहे. शासनाने त्वरित पावले न उचलल्यास न्यायालयीन लढाईचा मार्ग अवलंबिल्या जाणार आहे, तसेच तीव्र आंदोलन उभारण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर यांनी दिली.