- संतोष येलकर
अकोला : राज्य दुष्काळ निवारण समितीची बैठक सोमवारी मुंबई येथील मंत्रालयात होत आहे. राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या १८० तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीवर या बैठकीत मंथन होणार आहे.पावसातील खंड, भूजल पातळी,जमिनीतील आर्द्रतेचे कमी प्रमाण आणि त्यामुळे खरीप पिकांच्या उत्पादनात कमालीची घट झाल्याच्या पृष्ठभूमीवर, राज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असल्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात गत २३ आॅक्टोबर रोजी करण्यात आली. त्यानुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य दुष्काळ निवारण समितीची बैठक सोमवार, २९ आॅक्टोबर रोजी मुंबईतील मंत्रालयात होत आहे. राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या १८० तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती, पिकांचे उत्पादन व उत्पन्नाचा आढावा आणि दुष्काळ निवारणासाठी करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे.शेतकऱ्यांना मदतीचा विचार होणार?दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या तालुक्यांमध्ये जमीन महसुलात सूट, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपांच्या वीज देयकात सूट, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात सूट, पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात टँकरद्वारे पाणी पुरवठा योजना, टंचाईग्रस्त गावांतील शेतकºयांच्या कृषी पंपांची वीज जोडणी खंडित न करणे इत्यादी उपाययोजनांची घोषणा सरकारकडून करण्यात आली. यासोबतच दुष्काळी तालुक्यांमध्ये संकटात सापडलेल्या शेतकºयांना मदत देण्यासंदर्भात राज्य दुष्काळ निवारण समितीच्या बैठकीत विचार होणार काय, याकडे लक्ष लागले आहे.