अकोला: रेणुका माता मल्टी स्टेट को-आॅप. अर्बन सोसायटी अहमदनगर शाखा अकोला येथे आर्थिक लाभासाठी एका खातेदाराच्या खात्यात १ कोटी ४९ लाख रुपये धनादेशाने जमा करून नंतर ही रक्कम काढून घेणारा शाखाधिकारी सुग्रीव रामनाथ खेडकर याला रामदासपेठ पोलिसांनी मंगळवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ४ व ५ सप्टेंबर २०१३ रोजी रेणुका माता मल्टी स्टेट को-आॅप. अर्बन सोसायटी अहमदनगर शाखा, अकोला येथील सहायक शाखाधिकारी सुग्रीव रामनाथ खेडकर व रोखपाल परमेश्वर बापूराव गावडे यांनी खातेदार अशफाक हुसैन इरफान हुसैन (रा. नायगाव) यांच्यासोबत संगनमत केले. स्वत:च्या आर्थिक लाभाच्या दृष्टिकोनातून सुग्रीव खेडकर याने खातेदार अशफाक हुसैन यांच्या खात्यात रक्कम शिल्लक नसताना, त्याला १ कोटी ४९ लाख रुपयांचे धनादेश देऊन त्याच्या खात्यात ही रक्कम जमा केली. हा प्रकार लक्षात आल्यावर पतसंस्थेने चौघांविरुद्ध रामदासपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांनी खेडकर याचा सहकारी परमेश्वर गावडे याला यापूर्वीच अटक केली होती. परंतु सुग्रीव खेडकर हा फरार होता. त्याला तब्बल साडेचार वर्षांनंतर पोलिसांनी अटक केली होती. (प्रतिनिधी)