शहरातून गायगाव ते निमकर्दा ते निंबा फाटा ते तेल्हारा तालुक्यासह बुलडाणा जिल्ह्यात जाण्यासाठी डाबकी राेडवरील रेल्वे मार्ग ओलांडून जावे लागते. याठिकाणी रेल्वेमुळे प्रवासी वाहतूक व जड वाहतुकीच्या लांबच लांब रांगा लागत असल्याचे पाहून उड्डाणपुलाची गरज हाेती. त्या अनुषंगाने मागील काही वर्षांपासून याठिकाणी उड्डाणपुलाच्या निर्माण कार्र्याला सुरूवात झाली आहे. पुलाचे काम अतिशय संथगतीने सुरू असून उड्डाणपुलाच्या दोन्ही साईडचे रस्ते अरुंद झाले असून खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. यामुळे सदर रस्ता नागरिकांसाठी जीवघेणा ठरत आहे. उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूला उभारण्यात आलेल्या भिंतीला सिमेंट ब्लॉक लावण्यात आले असले तरी त्यांना ठिकठिकाणी तडे गेल्याचे समाेर आले आहे. अशा ठिकाणी सिमेंट लावून चिरा बुजविण्याचा केविलवाणा प्रकार केला जात आहे. त्यामुळे पुलावरून वाहतूक सुरू होण्यापूर्वीच पुलाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या प्रकाराची लाेकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाने गंभीर दखल घेण्याची मागणी महानगर सुधार कृती समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे, अ.भा.ग्राहक पंचायतचे संघटनमंत्री हेमंत जकाते यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
उड्डाणपुलाच्या सिमेंट ब्लॉकला तडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 4:18 AM