अकोला: विधान परिषदेच्या अकोला-बुलडाणा-वाशिम स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता मंगळवारपासून लागू करण्यात आली. आचारसंहितेच्या कालावधीत नवीन विकासकामे करता येणार नसल्याने, जिल्ह्यातील विकासकामांना महिनाभराचा 'ब्रेक' लागणार आहे. विधान परिषदेच्या अकोला -बुलडाणा-वाशिम स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम मंगळवारी निवडणूक आयोगामार्फत जाहीर करण्यात आला असून, या निवडणुकीसाठी २७ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. ३0 डिसेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आली असून, आचारसंहितेच्या कालावधीत सुरू करण्यात आलेली, कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर ) देण्यात आलेली विकासकामे करता येतील; मात्र नवीन विकासकामे करता येणार नाहीत. त्यामुळे महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका व इतर विविध विभागांच्या प्रस्तावित विकासकामांना आचारसंहितेच्या कालावधीत 'ब्रेक' लागणार आहे. निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतरच रखडलेल्या विकासकामांचा मार्ग मोकळा होणार आहे. विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे महापालिकेच्या तब्बल ३१ कोटींच्या विकासकामांना मंगळवारी ह्यब्रेकह्ण लागला. आचारसंहितेमुळे विविध विकासकामांच्या निविदा प्रकाशित करणे शक्य नसल्याने शहर विकासाची कामे नवीन वर्ष उजाडेपर्यंत लांबणीवर गेल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागाला शहरात विकासकामांसाठी विविध तरतुदीअंतर्गत क ोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त झाला. त्यामुळे नगरसेवकांनी प्रभागात सिमेंट व डांबरी रस्ते, नाल्या, पथदिव्यांसाठी खांब, पेव्हर ब्लॉक आदी कामांचे प्रस्ताव बांधकाम विभागाकडे सादर केले होते. संबंधित प्रस्तावांना मंजुरीसाठी जिल्हाधिकार्यांकडे पाठविल्यानंतर निविदा प्रक्रियेचे पुढील सोपस्कार पार पाडले जाणार होते. त्यापूर्वीच विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आणि कोट्यवधींच्या विकासकामांना 'ब्रेक' लागला. आचारसंहिता ३0 डिसेंबरपर्यंत संपुष्टात येण्याची चिन्हं आहेत. त्यानंतरच विकासकामांची गाडी मार्गी लागेल, हे स्पष्ट झाले आहे.
विकासकामांना महिनाभराचा ‘ब्रेक’
By admin | Published: November 25, 2015 2:10 AM