अकोला: कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता, जिल्ह्यात रास्तभाव दुकानांच्या तपासणीला ‘ब्रेक’ लागला असून, गत दोन महिन्यांपासून रास्तभाव दुकानांच्या तपासणीचे तालुकानिहाय अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याची प्रक्रिया रखडली आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत रास्तभाव दुकानांची दरमहा तालुकास्तरावरील पुरवठा निरीक्षक, निरीक्षण अधिकारी व तहसीलदारांमार्फत तपासणी करण्यात येते. त्यामध्ये रास्तभाव दुकानांमधील धान्याचा पुरवठा, उचल केलेल्या धान्यातून वाटप केलेले धान्य, शिल्लक धान्य साठा, स्टाॅक रजिस्टर, नागरिकांच्या तक्रारी इत्यादी प्रकारची तपासणी करुन नोंदी घेतल्या जातात. परंतु गत फेब्रुवारीपासून जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढला असून, कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील १ हजार ६० रास्तभाव दुकानांच्या दरमहा तपासणीच्या कामाला ‘ब्रेक’ लागला आहे. तपासणीचे काम ठप्प असल्याने गत दोन महिन्यातील रास्तभाव दुकानांच्या तपासणीचे तालुकानिहाय अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आले नाही.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रास्तभाव दुकानांची तपासणी करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यातील रास्तभाव दुकानांच्या तपासणीचे तालुकानिहाय अहवाल प्रलंबित आहेत.
बी.यू. काळे
जिल्हा पुरवठा अधिकारी