अकाेला : काेराेना विषाणूची साखळी खंडित करण्याच्या उद्देशातून जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. नागरिकांची गैरसाेय टाळण्यासाठी सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत जीवनावश्यक साहित्याची विक्री व खरेदी करण्याला परवानगी देण्यात आली असली तरी या नियमांना ठेंगा दाखवत काही व्यावसायिक दुकाने खुली करीत असल्याची बाब समाेर आली आहे. अशा २० व्यावसायिकांना मनपाच्या अतिक्रमण विभागाने हिसका दाखवत ५७ हजार रुपयांचा दंड वसूल केला.
अकाेलेकरांची गैरसाेय टाळण्याच्या उद्देशातून केवळ जीवनावश्यक वस्तूंची विक्री व खरेदी करण्याला परवानगी देण्यात आली आहे. या नियमावलीचा गैरफायदा घेत अनेक व्यावसायिक त्यांची दुकाने खुली करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. मंगळवारी सकाळी अतिक्रमण निर्मूलन पथकाने शहराच्या मध्यभागातील पिंजारी गल्ली, जुना कपडा बाजार, टिळक रोड, खेतान गल्ली, फतेह चौक, इंदौर गल्ली तसेच अलंकार मार्केट येथील एकूण २० व्यावसायिकांना दंड आकारण्याची कारवाई केली. या कारवाईत अतिक्रमण विभागाचे प्रवीण मिश्रा, चंद्रशेखर इंगळे, जीवन मानकीकर, करण ठाकूर, रफीक अहमद, रूपेश इंगळे, वैभव कवाडे, योगेश कंचनपुरे, जय गेडाम, संतोष भगत, मो. सलीम, पवन चव्हाण, आदींचा समावेश होता.