अकोला: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये कुपोषणावर नियंत्रणासाठी राज्य शासनामार्फत ‘द ब्रेकफास्ट रिव्होल्युशन’ हा उपक्रम राबवणार असल्याची माहिती आहे. प्रारंभी हा उपक्रम अमरावती जिल्ह्यातील दहा शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार असून, उपक्रमांतर्गत या शाळांतील विद्यार्थ्यांना सक्तीचा आहार दिला जाणार आहे. हा उपक्रम यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण राज्यभरात सक्तीच्या आहाराचा हा पॅटर्न राबविण्यात येणार आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये कुपोषण आणि कुपोषणाशी निगडित आजारांवर नियंत्रणासाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘द ब्रेकफास्ट रिव्होल्युशन’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या संदर्भात कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे आणि डेसिमल फाउंडेशनची बैठक निकतीच पार पडली. यावेळी राज्य शासन आणि डेसिमल फाउंडेशन यांच्यात करार करण्यात आल्याची माहिती आहे. त्या अनुषंगाने प्रारंभी हा उपक्रम अमरावती जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार असून, यासाठी जिल्ह्यातील विशेषत: ग्रामीण भागातील दहा शाळांची निवड केली जाणार आहे. प्रायोगिक तत्त्वावरील हा प्रयोग यशस्वी झाल्यास सक्तीच्या आहाराचा ‘द ब्रेकफास्ट रिव्होल्युशन’ पॅटर्न राज्यभरात राबविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.असा असेल सक्तीचा आहारउच्च प्रतीचे सोयाबीन, बाजरी, मुरमुरे यासह ज्या माध्यमातून कर्बोदके, प्रथिने, पोषण, फायबर तसेच ए आणि डी जीवनसत्त्व मिळतील, अशा पदार्थांचे वितरण करण्यात येणार आहे.अशी असेल कार्यप्रणाली
- शिक्षकांच्या उपस्थितीतच दिला जाईल आहार.
- विद्यार्थ्यांच्या आहारात खंड पडणार नाही, याकडे विशेष लक्ष.
- प्रत्येक सहा महिन्यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची होईल तपासणी.
- आरोग्य सुधारण्याच्या प्रक्रियेत सातत्यता राहावी, याकडे विशेष लक्ष.