- सदानंद खारोडे लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव बाजार: तेल्हारा तालुक्यातील तळेगाव बाजार येथे श्री सोमेश्वर मंदिर असून, येथे दरवर्षी पोळ्यानिमित्त यात्रा भरते. दीडशे वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा यंदा प्रथमच कोरोनामुळे खंडित होणार आहे. पोळ्याच्या निमित्ताने भरणाऱ्या यात्रेत बारा गावांचे शेतकरी बैलजोड्यांना सजवून सोमेश्वराच्या दर्शनासाठी येऊन उत्सवात सहभागी व्हायचे; परंतु यंदा गावस्तरावरच पोळा उत्सव साजरा होणार आहे.दरवर्षी पोळ्यानिमित्त गावातून सजविलेल्या वृषभराजांची मिरवणूक निघायची. गावात मोठी यात्रा भरायची; परंतु कोरोना महामारीमुळे दीडशे वर्षांची पोळा उत्सवाची परंपरा यंदा खंडित झाली आहे. तळेगाव बाजार येथे श्री सोमेश्वर मंदिर असून, येथे पुरातन काळापासून पोळ्याच्या दुसºया दिवशी गावा-गावातून शेतकरी आपले बैल सजवून श्री सोमेश्वर मंदिरात दर्शनासाठी आणतात. अकोली, हिंगणी बु., हिंगणी खु.,मालठाणा, काळेगाव, रायखेड, गोर्धा, घोडेगाव, चांगलवाडी, बेलखेड, हिवरखेड आणि तळेगाव बाजार येथील शेतकरी आपले बैल सजवून ढोल-ताशा पथकासह मिरवणुकीत सहभागी व्हायचे. दिवसभर हा उत्सव चालायचा. नंतर सायंकाळी पाच वाजता सोमेश्वर मंदिर परिसरात सर्व भाविक भक्तांना महाप्रसाद वितरण करण्यात यायचा. सदर उत्सव केव्हापासून चालू आहे, असे गावातील वृद्ध नागरिकांना विचारले असता, त्यांनी सदर उत्सव पुरातन काळापासून नियमितपणे चालू असल्याचे सांगितले; परंतु यंदा कोरोनामुळे पोळा उत्सव होणार नाही. गावस्तरावरच पोळा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.यावर्षी कोरोनामुळे गावातील पोळ्यानिमित्त साजरा होणारा द्वारका उत्सव बंद राहणार आहे. त्यामुळे गावात बैलजोड्यांची मिरवणूक निघणार नाही.-संतोष खारोडे,अध्यक्ष सोमेश्वर संस्थान तळेगाव बाजार.पोळ्यानिमित्त होणाºया द्वारका उत्सवाला दीडशे वर्षांची परंपरा आहे; परंतु यंदा प्रथमच उत्सव खंडित झाला आहे. गावस्तरावरच पोळा सण साजरा होणार आहे.-मधुकरराव राऊत, संचालक, सोमेश्वर संस्थान, तळेगाव बाजार.
पोळा उत्सवाची दीडशे वर्षांची परंपरा खंडित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 10:16 AM