खामगाव : साडेतीन महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये विविध पक्षांच्या उमेदवारांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून फेसबुक, व्हॉट्स अँप, ट्विटर, हाईक या माध्यमातून प्रचार केला; मात्र आता निवडणूक आयोगाने सोशल मीडियावरून प्रचार करणार्यांची गोची केली आहे. ज्या उमेदवाराची जाहिरात अथवा पेडन्यूज सोशल मीडियावर येईल त्या उमेदवाराच्या निवडणूक खर्चात त्या जाहिरातीचा समावेश केल्या जाईल, असा निर्णय निवडणूक विभागाने घेतल्याने नेटकर्यांची दांडी उडाली आहे. जिल्ह्यात साडेतीन महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीचा अनुभव लक्षात घेऊन विविध पक्षाच्या नेत्यांनी व संभाव्य उमेदवारांनी व्हॉट्स अँप फौज उभी केली आहे. या माध्यमातून जास्तीत जास्त उमेदवारांनी आपण पोहचू शकू, हा उद्देश होता; मात्र निवडणूक आयोगाने एका परिपत्रकातून व्हॉट्स अँप प्रचार करणार्यांना दणका दिला आहे. आयोगाच्या म्हणण्यानुसार व्हॉट्स अँप अथवा इतर कुठल्याही सोशल मीडियावर विना परवानगी जाहिरात कुठल्याही पक्षाला अथवा उमेदवाराला करता येणार नाही. सोशल मीडियावर ज्या उमेदवाराची जाहिरात दिसेल त्या उमेदवाराच्या निवडणूक खर्चात सोशल मीडियावरील जाहिरातचे पैसे लावले जातील. या निर्णयामुळे आता जिल्ह्यातील नेटकर्यांची गोची झाली असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. सर्वच विधानसभा मतदारसंघात संभाव्य उमेदवारांनी आपल्या व्हॉट्स अँप प्रचारासाठी एक टीम उभी केली आहे. या टीममध्ये तंत्रज्ञानाची जाण असणारे कार्यकर्ते भरती करण्यात आले आहेत. हे कार्यकर्ते व्हॉट्स अँपवर ग्रुप बनवून काही क्षणात एखादी माहिती व्हॉट्स अँपवर तत्काळ टाकतात. याशिवाय उमेदवाराच्या जाहिरातीही मोठय़ा प्रमाणावर टाकण्यात येत असल्याचे चित्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अनुभवयास मिळाले आहे. याबाबत अधिकच्या गाईडलाईन निवडणूक विभागाकडून लवकरच प्राप्त होणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
सोशल मीडियावर प्रचार करणार्यांना ब्रेक
By admin | Published: September 23, 2014 12:00 AM