अकोला : जगभरासह भारतातही कर्करोग झपाट्याने पसरत आहे. विशेषत: महिलांमध्ये स्तन कर्करोगाचे प्रमाण लक्षणीय आहे. यावर मात करण्यासाठी संपूर्ण भारतीय संशोधकांनी थर्मल इमेजिंग तंत्रज्ञानावर आधारीत ब्रेस्ट जॅकेटचे संशोधन केले असून, हे तंत्रज्ञान आजार होण्यापूर्वीच स्तन कर्करोगाचे निदान करणार असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी म्हटले.मेक इन इंडिया अंतर्गत केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक व सूचना प्रौद्योगिकी खात्याकडून निर्मित ब्रेस्ट जॅकेटचे शनिवार २७ जुलै रोजी अकोल्यातील जिल्हा स्त्री रुग्णालय येथे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी उद््घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय सचिव अजय सहानी, संशोधक डॉ. ए. सीमा, ‘एनआयसी’चे संचालक अवनीश गुप्ता, मुराटा संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक मल्होत्रा, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, आरोग्य उपसंचालक डॉ. फारुकी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, डॉ. आरती कुलवाल, उपमहापौर वैशाली शेळके यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या प्रसंगी केंद्रीय सचिव अजय सहानी यांनी ब्रेस्ट जॅकेट बद्दल माहिती देताना सांगितले की, देशात विकसीत केकेले वैद्यकीय तंत्रज्ञान हे तळागळापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. जे संशोधन, तंत्रज्ञान विकसीत होईल ते प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. उद््घाटन कार्यक्रमानंतर स्तन कर्करोग विशेष तपासणी करण्यात आली. यावेळी स्तन कर्करोगाच्या निदानासाठी विकसित थर्मल इमेजिंग तंत्रज्ञानावर आधारित थर्मल प्रतिमा विशेष कॅमेरा असलेल्या ब्रेस्ट जॅकेटचा प्रथमच उपयोग करण्यात आला. ही तपासणी मोहीम २९ जुलैपर्यंत राबविण्यात येणार आहे.
'ब्रेस्ट जॅकेट करणार योग्यवेळी स्तन कर्करोगाचे निदान - संजय धोत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 13:35 IST