अकोला: सर्व शिक्षा अभियान (सत्रविशीत शिक्षण अपंग) विभागांतर्गत केलेल्या कामासाठीचे काढलेल्या नऊ लाख रुपयांच्या देयकाबाबत तक्रारकर्त्यांकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना सर्वशिक्षा अभियानचा जिल्हा समन्वयक श्याम रामदास गुल्हाने याला मंगळवारी रात्री लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. लाचखोर गुल्हानेला बुधवारी न्यायालयात हजर केले जाईल. एका तक्रारकर्त्याने मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीनुसार, सर्वशिक्षा अभियानातील सत्रविशीत शिक्षण अपंग विभागाचे जिल्हा समन्वयक श्याम रामदास गुल्हाने याने तक्रारकर्त्याला त्याचे काढलेल्या ९ लाख रुपयांचे देयक देण्यासाठी पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानुसार मंगळवारी सायंकाळी जनता बाजाराजवळ रक्कम देण्याचे ठरले. त्यानुसार तक्रारकर्ता जनता बाजारामध्ये पैसे घेऊन आला. या ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक उत्तमराव जाधव, पोलीस निरीक्षक मोहोड यांनी सापळा रचला. आरोपी गुल्हाने हा पैसे घेण्यासाठी जनता बाजारामध्ये आला. त्याने तक्रारकर्त्याकडून पाच हजार रुपये स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला अटक केली. त्याचेकडून लाचेची रक्कम जप्त करण्यात आली.
सर्व शिक्षा अभियानातील समन्वयकाने स्वीकारली लाच
By admin | Published: March 11, 2015 1:33 AM