लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गुटखा माफियांसह अवैध धंदे व सट्टा माफियांवर कारवाई करीत त्यांना ‘सळो की पळो’ करणाऱ्या जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांना २५ हजार रुपयांची लाच देण्याचे आमिष देणाऱ्या गुटखा माफिया घनश्याम अग्रवाल यास अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने शुक्रवारी रंगेहात अटक केली. घनश्याम अग्रवाल याचा गत १५ दिवसांच्या कालावधीत तब्बल २५ लाख रुपयांचा गुटखा अळसपुरे यांनी जप्त केल्यानंतर त्यांना वारंवार पैशांचे आमिष देण्यात आले होते; मात्र अळसपुरेंनी या प्रकरणाची आधीच एसीबीकडे तक्रार केली होती, हे विशेष.गुटखा माफिया घनश्याम सीताराम अग्रवाल याच्या मालकीच्या जुन्या भाजी बाजारातील अंबिका पान मसाला, जगदंबा सुपारी स्टोअर्स आणि भगवती सुपारी स्टोअर्समधून प्रतिबंधित गुटख्याची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू असताना सहायक पोलीस निरीक्षक हर्षराज अळसपुरे यांनी छापा टाकून तब्बल २५ लाख रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त केला होता. त्यानंतर गुटखा माफिया अग्रवाल याने अळसपुरे यांना गुटख्यावर कारवाई न करण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच देण्याचे आमिष दिले; मात्र अळसपुरे यांना लाच स्वीकारणे नसल्याने त्यांनी या प्रकरणाची तक्रार अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे केली. यावरून गुटखा माफिया घनशाम अग्रवाल हा शुक्रवारी लाचेची रक्कम देण्याचा प्रयत्न करीत असतानाच सापळा रचून असलेल्या एसीबीने त्याला २५ हजार रुपयांची लाच देताना रंगेहात अटक केली. त्याला अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या कार्यालयात ठेवण्यात आले आहे. घनश्याम अग्रवाल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.पहिलीच कारवाईलाच देण्याचे आमिष देणाऱ्या गुटखा माफिया घनश्याम अग्रवाल याच्यावर कारवाई झाल्याने अशा प्रकारची बऱ्याच वर्षांनंतर पहिलीच कारवाई असल्याची माहिती आहे. पोलीस अधिकाऱ्याला लाच देण्याचे आमिष दिल्यानंतर सदर अधिकाऱ्याने एसीबीक डे तक्रार केली आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.पोलीस खात्यात राज्यभर चर्चासहायक पोलीस निरीक्षक हर्षराज अळसपुरे यांनी लाच न स्वीकारता आमिष देणाऱ्या गुटखा माफियाची एसीबीकडे तक्रार केल्याने राज्यातील पोलीस खात्यात या प्रकरणाची चांगलीच चर्चा होती. बहुतांश वेळा पोलीस अधिकारी आणि कर्मचारी लाच स्वीकारताना अटक होतात; मात्र अळसपुरे यांनी लाच न स्वीकारता आमिष देणाऱ्या गुटखा माफियास एसीबीच्या ताब्यात दिले.
लाच देण्याचे आमिष; गुटखामाफिया गजाआड
By admin | Published: July 01, 2017 12:36 AM