लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बक्षीराम रुडमल हायस्कूलमध्ये कार्यरत असलेल्या एका लिपिकास ५ हजार ५०० रुपयांची लाच घेताना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सोमवारी सायंकाळी अटक केली. भविष्य निर्वाह निधीची ५ लाख ५० हजार रुपयांची रक्कम मंजूर करण्यासाठी मुख्याध्यापकाला एक टक्का म्हणजेच साडे पाच हजार रुपये द्यावे लागतील, असे म्हणून लाचेची मागणी करणाºया लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी अटक केली. खडकीतील रहिवासी अशोक एकनाथ शिंदे (५३) असे लाचखोर लिपिकाचे नाव आहे. बी.आर. हायस्कूलमध्ये अशोक शिंदे लिपिक म्हणून कार्यरत आहेत. याच शाळेत एका शिक्षकाच्या भविष्य निर्वाह निधीची साडेपाच लाख रुपयांची रक्कम मंजूर करण्यासाठी मुख्याध्यापकाला एक टक्का रक्कम देण्यासाठी हा लिपिक तगादा लावत होता. एक टक्का दराने ही रक्कम साडेपाच हजार रुपये होते. त्यामुळे ही लाचेची रक्कम तातडीने देण्याची मागणी लिपिक शिंदे याने केली. मात्र, शिक्षकाला लाच द्यायची नसल्याने त्यांनी या प्रकरणाची तक्रार अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्यानुसार लाचलुचपत पथकाने १६ आॅगस्ट रोजी लाचेच्या मागणीची पडताळणी केली. त्यात सरकारी पंचासमक्ष अशोक शिंदे याने पैशाची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर २१ आॅगस्ट हा दिवस पैसे देण्याचा व्यवहार ठरला होता. मात्र, शिंदेला संशय आल्याने त्याने रक्कम स्वीकारण्यास टाळाटाळ केली व रक्कम स्वीकारली नाही. मात्र, त्याने लाचेची मागणी केल्याचे पडताळणीमध्ये आल्याने त्याला सोमवारी लाचलुचपत पथकाने अटक केली.
बी.आर. हायस्कूलचा लाचखोर लिपिक गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 12:24 AM