अकोला : विक्रीकर विभागाचा सहायक आयुक्त अमर सेठी याच्या मार्फत २ लाखांची लाच स्वीकारणाऱ्या जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे याला अखेर २५ दिवसांनंतर गुरुवारी निलंबित करण्यात आले.अकोट बाजार समितीच्या सचिवांसह त्यांच्या अधीनस्त असलेल्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती करण्यासाठी तसेच थकबाकी रकमेच्या प्रस्तावास मान्यता देण्यासाठी जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे याने त्याचा लाचखोर साथीदार तसेच विक्रीकर विभागाचा सहायक आयुक्त अमर सेठी याच्यामार्फत ५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. यामधील २ लाख रुपयांची लाच अमर सेठी याच्या घरात स्वीकारताच या दोघांनाही अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवार ९ जुलै दुपारी ४ वाजताच्या सुमारास अटक केली. या दोन्ही लाचखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. पोलीस कोठडी भोगल्यावर आता न्यायालयीन कोठडीत असलेल्या या दोन्ही अधिकाºयांना तत्काळ निलंबित करणे अपेक्षित असतानाही तब्बल २५ दिवसांचा विलंब सहकार विभागाने लावला आहे. जिल्हा उपनिबंधकावर कारवाई झाली असली तरी विक्रीकर विभागाचा सहायक आयुक्त अमर सेठी याच्यावर अजून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे सेठीला अभय कोणाचे, हा प्रश्न आता चर्चेत आला आहे.
जामीन नाकारला!लाचखोर लोखंडे आणि सेठी या दोघांना १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर न्यायालयाने आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्यानंतर आरोपींनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला; मात्र न्यायालयाने जामीन अर्जावरील सुनावणी ३ आॅगस्ट रोजी ठेवल्याने आरोपींनी ही सुनावणी लवकर घेण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली; मात्र उच्च न्यायालयाने २७ ते ३१ जुलै या कालावधीत जामीन अर्जावरील सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालयातच घेण्याचे स्पष्ट केले. त्यामुळे २९ जुलै बुधवारी या दोन्ही आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली असून, न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला.