अकोला: शासकीय कार्यालयाला घर भाड्याने देण्यासाठीचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम उपविभाग आकोट अंतर्गत येणारे तेल्हारा येथील शाखा अभियंता भगवान तुकाराम दामधर (५७) व त्यांचा चतुर्थश्रेणी कर्मचारी रमेश हरिमन निनोते (५९) यांना बुधवारी तक्रारकर्त्याकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. तक्रारकर्त्याने ९ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारकर्त्याचे घर शासकीय कार्यालयासाठी भाड्याने दिले आहे. घराचे शासनमान्य भाडे ठरविण्यासाठीचा प्रस्ताव त्यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग आकोट यांच्यामार्फत कार्यकारी अभियंत्याकडे पाठविला. तेथून घरभाड्याचा प्रस्ताव तेल्हारा शाखेतील कनिष्ठ अभियंता भगवान तुकाराम दामधर यांच्याकडे प्रत्यक्ष पाहणी व मूल्यांकनासाठी पाठविण्यात आला; परंतु अभियंता भगवान दामधर याने जाणीवपूर्वक तक्रारकर्त्याचा प्रस्ताव वर्षभर प्रलंबित ठेवला. तक्रारकर्त्याने प्रस्तावाबाबत विचारणा केल्यावर अभियंत्याने त्यांना प्रत्यक्ष पाहणी व सकारात्मक मूल्यांकन करून जास्तीचे भाडे दाखवितो, यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितली. बुधवारी तेल्हारा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात पैसे देण्याचे ठरल्यानंतर तक्रारदार पैसे घेऊन तेथे आले. या ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला होता. दामधर यांच्या वतीने त्यांचा सहकारी रमेश निनोते याने तक्रारकर्त्याकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताच, दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी दोघाही लाचखोरांना रंगेहात अटक केली. त्यांच्यावर तेल्हारा पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम ७, १२, १३(१)(ड) १३(२) नुसार गुन्हा दाखल केला. * लाचखोर समन्वयकाची कारागृहात रवानगी९ लाख रुपयांच्या देयकासाठी मंगळवारी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारणारा सर्व शिक्षा अभियानातील जिल्हा समन्वयक श्याम गुल्हाने याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी बुधवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने गुल्हाने याची कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले.
लाचखोर शाखा अभियंता गजाआड
By admin | Published: March 12, 2015 1:45 AM