सचिन राऊत, अकोला : महावितरण कंपनीच्या जुने शहरातील गजानन नगर मध्ये असलेल्या उपविभाग क्रमांक दोन मधील तक्रार निवारण केंद्रात कार्यरत कनिष्ठ कार्यालयीन सहायकास एक हजार रुपयांची लाच घेताना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी सायंकाळी रंगेहाथ अटक केली. या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या जिल्हा तक्रार निवारण केंद्र क्रमांक ११ मध्ये कार्यरत सचिन भाऊराव मुंडे वय ३७ वर्ष या कनिष्ठ कार्यालयीन सहायकाने तक्रारदाराच्या सोलार रुप टॉप बसवून दिल्यानंतर त्याची रिप्लेसमेंट नोंद करण्यासाठी तक्रारदारास एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली हाेती़ मात्र त्यांना लाच देणे नसल्याने तक्रारदाराने या प्रकरणाची तक्रार अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली़ यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून आरोपी कनिष्ठ सहायक सचिन मुंडे यास शुक्रवारी अटक केली.
त्याच्याकडून एक हजार रुपयांची लाचेची रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे़ ही कारवाई एसीबीचे पाेलिस अधीक्षक माराेती जगताप, अपर पाेलिस अधीक्षक देवीदास घेवारे यांच्या मार्गदर्शनात अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शैलेश सपकाळ यांच्या सूचनेवरून पाेलिस निरीक्षक नरेंद्र खैरनार, राहुल इंगळे, किशोर पवार, प्रदीप गावंडे, श्रीकृष्ण पळसपगार, नीलेश शेगोकार, संदीप टाले यांनी केली.