पांढुर्णा: पातूर तालुक्यातील चोंढी धरणमार्गे-मेडशी रस्त्यावर असलेल्या पुलाची दयनीय अवस्था झाली आहे. या मार्गाने मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे, तसेच पुलाची दुरवस्था झाल्याने, गत वर्षभरापासून या मार्गावरील एसटी बस बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
चोंढी परिसरात सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या ढगफुटीमुळे पूल वाहून गेल्यामुळे पुलाची दयनीय अवस्था झाली आहे. त्यानंतर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून थातुरमातुर पद्धतीने पुलावर मुरुम टाकला. त्यानंतर, कोणत्याही प्रकारचे काम नसल्याने पुलाची अवस्था जैसे थे आहे. त्यामुळे महामंडळची बस बंद आहे, तसेच या पुलावर अनेक किरकोळ अपघाताच्या घटना झाल्या आहेत. याकडे सार्वजनिक विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे याकडे लोकप्रतिनिधींसह वरिष्ठांनी लक्ष देऊन पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. परिसरातील ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी वाशीम जिल्ह्यामध्ये ये-जा करण्यासाठी याच मार्गाचा वापर करीत असल्याने या मार्गावर वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. (फोटो)