- नितीन गव्हाळे
अकोला : मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे शिक्षण क्षेत्र प्रभावित झाले आहे. शिक्षणाची पोकळी भरून काढण्याचे प्रयोग चालू असताना पुरोगामी महाराष्ट्राने एक अभिनव प्रयोग पुढे आणला. त्याचे नाव ब्रिज कोर्स संवाद सेतू अभ्यासक्रम. यामुळे मुले अभ्यासक्रमाशी जोडण्याचा मार्ग सुकर झाला. बार्शीटाकळी तालुक्यातल्या जिल्हा परिषद शाळा सारकिन्ही येथील शिक्षक ब्रह्मसिंग राठोड व त्यांच्या सहकारी शिक्षकांनी शिक्षणाचा कायमस्वरूपी तोडगा काढून ब्रिज गार्डनची निर्मिती केली. यामुळे ऑनलाइन शिक्षणाच्या अडचणींवर मात करता आली.
ब्रिज कोर्स अभ्यासक्रमातील सक्षम बनूया, सराव करू या कल्पक होऊ या यासारखी उपक्रम उपयुक्त आहेत. परंतु काही उपक्रम राबविताना, मुलांची प्रत्यक्ष चर्चा करूनच जाणून घ्यावे लागते. त्याशिवाय सक्षम बनवता येत नाही. सराव करताना अडचणी येतात. ग्रामीण भागातल्या पालक मुलांकडे फारसे लक्ष देऊ शकत नाही. त्यासाठी येथील शिक्षकांनी परिश्रमपूर्वक ब्रिज गार्डनची संकल्पना अस्तित्वात आणली.
ब्रिज गार्डन म्हणजे काय?
यामध्ये सर्व अभ्यासक्रम, सर्व संकल्पना उदाहरणांसह या ब्रिज गार्डनमध्ये लावूनच टाकल्या. हाच सेतू भाग आहे. त्यामुळे चर्चा करावी तर कशी, संवाद कसा साधावा, क्रियापद कसे ओळखावे? याचे सर्व उदाहरणासह नमुने दिले आहेत. जोड शब्द, म्हणी, भाषिक खेळ, मुलाखत, माहितीपर उतारे या सर्व संकल्पना या ब्रिज गार्डनमध्ये लावण्यात आल्या. त्यामुळे कोरोना नियमाचे पालन करून दोन-तीन विद्यार्थी ब्रिज गार्डनमध्ये प्रवेश करतात. न समजलेली संकल्पना उदाहरणासह समजून घेतात.
मोबाइल नसलेले पालकही काढतात वेळ!
ज्यांच्याकडे मोबाइल नाही. असे पालकही वेळ मिळताच, एकावेळी फक्त दोन या पद्धतीने बीच गार्डनमध्ये येतात. मुलांना अवघड जाणाऱ्या संकल्पना स्वतः समजून घेतात व घरी मुलांना समजून सांगतात. त्यामुळे मुले सेतू अभ्यासक्रमाशी जोडल्या गेली आहे. कोरोनापासून सुट्टी आणि अभ्यासाची गट्टी असे वातावरण तयार झाले आहे. एकावेळी दोन-तीन मुले याप्रमाणे दिवसभरात ५० मुले याचा लाभ घेऊन खऱ्या अर्थाने सक्षम होत आहेत.
पटसंख्या वाढीचा बहुमान
मागील पाच वर्षापासून या शाळेची पटसंख्या वाढत आहे. आता ती ४८वरून १७५ वर पोहोचली आहे . यावेळी जि.प. अकोलाकडून याबाबत गौरव केला. बाहेरगावची मुलेही नातेवाइकांकडे राहून या शाळेत शिकतात.
ऑनलाइन शिक्षणाच्या अडचणीवर मात करीत विद्यार्थ्यांना अभ्यासाची पुन्हा संधी मिळावी. यासाठी आमच्याकडील शिक्षकांना परिश्रमपूर्वक ब्रिज गार्डन तयार केले आहे. दररोज ५० विद्यार्थी याचा लाभ घेत, सक्षम होत आहेत.
- ब्रह्मसिंग राठोड, मुख्याध्यापक, जि. प. शाळा सारकिन्ही
कोरोनाकाळात ब्रिज गार्डनमुळे आनंददायी शिक्षण व अनुभव मिळाले. जोड शब्द, म्हणी, भाषिक खेळ, मुलाखत, माहितीपर उतारे या सर्व संकल्पना या ब्रिज गार्डनमध्ये आहेत. त्याआधारे आम्ही अभ्यास करतो.
- मनीष आंबेकर, विद्यार्थी जि. प. शाळा, सारकिन्ही