लोकमत न्यूज नेटवर्ककुरुम : अमरावती, अकोला, वाशिम या तीन जिल्ह्यांच्या सीमा जोडणारा व मूर्तिजापूर तालुक्यातील कुरुम ते कुरुम रेल्वे स्टेशन रस्त्यावरील ब्रिटिशकालीन दगडी पूल धोकादायक बनला असून, तो अपघातास निमंत्रण देत आहे. यामुळे वाहनचालकांना आपला जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे.कुरुम येथे मोठी बाजारपेठ असून, राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर वसले आहे. कुरुम रेल्वे हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाला जोडलेला असून, या रस्त्यावर १५० वर्ष जुना ब्रिटिशकालीन दगडी पूल आहे. या पुलाची बाजूची भिंत (साइड वॉल) पूर्णत: खचली आहे. तसेच पुलावरील संरक्षण कठडेदेखील खचले असून, त्याचे चौकोनी दगड लोकांनी लांबविले आहेत. तसेच पुलाच्या शेवटच्या टोकाजवळ रस्त्याची एक बाजू १० ते १२ फूट लांब व ३ ते ४ फूट खोल, अशी खचली आहे. मात्र, संबंधित विभागाकडून अद्यापपावेतो सदर पुलाची व रस्त्याची कुठल्याच प्रकारची दुरुस्ती करण्यात आली नसल्याने तो क्षतिग्रस्त झाला आहे. यामुळे तो रहदारी करणाऱ्यासाठी धोकादायक बनला आहे.कुरुम ते कुरुम रेल्वे स्टेशन रस्त्याने २४ तास वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. या रस्त्यावर रेल्वे स्टेशन, कॉटन जिन, गिट्टी खदान असल्यामुळे रेल्वेचे साहित्य, कॉटनच्या गठाणी, गिट्टी, रेती व विविध साहित्य घेऊन जाणारी जड वाहने याच रस्त्याने भरधाव जातात. रात्रीच्या वेळेस व सध्या पावसाळयाच्या दिवसात वाहनचालकांना खचलेला रोड दिसत नसल्यामुळे एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच रस्त्यावरील पूलालगत दोन्ही बाजूला लोखंडी पाइपचे संरक्षक कुंपण होते. त्या कुंपणाचे लोखंडी पाइप काही खोडसाळ लोकांनी, तर काही भंगारवाल्यांनी लांबविल्याचे गावकरी सांगतात. ब्रिटिशकालीन पुलाबाबत तात्पुरते प्रोव्हिजन गट ड मध्ये घेतले असुन गट क मधील प्रोव्हिजन पुन्हा शासनाकडे पाठविले आहे.ते एखाद्या महिन्यात मंजूरसुद्धा होऊन येईल . पुलाच्या चारही बाजुचे मेन्टेनन्स होऊन जाईल.शासनाने पी.डब्ल्यू,डी.कडून सदर पूल विभाग काढून स्वत:कडे घेतला आहे. त्यांनी याबाबतचा नवीन विभाग स्थापन करण्यात आला असून त्याअंतर्गत भविष्यात गट क चे काम एक वर्षात होईल. एखादी अघटित घटना घडू नये म्हणून भिंतीचे काम चार ते पाच दिवसात तातडीने पुर्ण करण्यात येईल.- नितीन झगडे,कनिष्ठ अभियंता, जि.प.उपविभाग, मूर्तिजापूर.
ब्रिटिशकालीन पूल बनला धोकादायक!
By admin | Published: July 15, 2017 1:17 AM