लोकमत न्यूज नेटवर्कलोहारा : येथील मन नदीवरील ब्रिटिशकालीन पूल धोकादायक ठरत आहे. कवठा बॅरेजचा पाणीसाठा या पुलाला टेकला आहे. या पुलाला कठडे नसल्याने तसेच पुलावरील खड्डे, साइड खचल्यामुळे २ जानेवारी रोजी शेगाव ते अकोट मार्गावरील वाहतूक एक तास बंद करण्यात आली होती. या पुलापर्यंत पाणी असल्याने वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. कठडे नसल्याने या पुलावर अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.मन नदीवर पाटबंधारे विभागाच्यावतीने कवठा येथे बॅरेजचे काम पूर्ण झाले आहे. या बॅरेजच्या पाणीसाठ्यामुळे लोहारा येथील पूल पाण्याखाली जात आहे. या पुलाची उंची वाढवून नवीन पूल निर्मिती करणे गरजेची आहे; मात्र राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्याांच्या दुर्लक्षामुळे पूल निर्मितीचे काम रखडले आहे. सध्या पाणीसाठा या पुलाला टेकला असून, अथांग पाणीसाठ्यामुळे व पुलाला कठडे नसल्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे. या पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात कठडे नसलेल्या या पुलावर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या पुलाची उंची वाढविण्याची तसेच कठडे बसविण्याची मागणी तंटामुक्ती अध्यक्ष महादेव तायडे, ग्रामपंचायत सदस्य जुनेद कुरेशी, प्रवीण मोरे, मुस्तफा देशमुख, अरुण बघे, आंबेद पटेल व ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)