लोहारा (अकोला): शेतातील रस्त्याच्या वादातून सख्ख्या धाकट्या भावासह पुतण्याने मोठ्या भावाची हत्या केल्याची घटना १६ ऑगस्ट रोजी लोहारा येथे घडली. धनवंता त्र्यंबक बघे असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणी उरळ पोलिसांनी चौघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. धनवंता बघे व मनोहर बघे या सख्ख्या भावंडामध्ये शेतीत जाण्याच्या रस्त्यावरून गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू आहे. शुक्रवारी धनवंता बघे हे आपल्या शेतात गेले असता मनोहर बघे व त्यांचा मुलगा अमोल बघे याने त्यांच्याबरोबर वाद घातला, तसेच काठीने बेदम मारहाण केली. यामध्ये ते बेशुद्ध पडले होते. त्यानंतर अमोल बघे याने धनवंता यांना बैलगाडीने गावात आणले. तसेच सेंट्रल बँकेसमोर लाठी व लाथाबुक्क्यांनी पुन्हा मारहाण केली.घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी त्यांना आवरून गंभीर जखमी झालेल्या धनवंता बघे यांना शेगाव येथील रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच बिट जमादार संजय वानखेडे, जयेश शिंगारे यांनी लोहारा येथे भेट दिली. तसेच अमोल बघे याला ताब्यात घेतले आहे. अमोल बघे याने खून एकट्यानेच केल्याचे पोलिसांना सांगितले. या प्रकरणी उरळ पोलिसांनी मनोहर त्र्यंबक बघे, चंद्रभागा मनोहर बघे, अमोल मनोहर बघे आणि निलेश मनोहर बघे यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
शेतीच्या वादातून भावाची हत्या; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 10:21 PM