उरळ: वडिलांचे घर विक्रीस काढल्याच्या कारणावरून भावाने स्वत:च्या मुलांना सोबत घेऊन सख्ख्या बहिणीची हत्या केल्याची घटना बाळापूर तालुक्यातील नागद येथे शुक्रवार, २७ जूनच्या रात्री घडली. मंजुराबाई अमझरे (५५) असे मृतक महिलेचे नाव असून, उरळ पोलिसांनी तिच्या हत्येप्रकरणी चार आरोपींना शनिवारी अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. नागद येथील महादेव झिंगराजी भाणगे यांची मुलगी मंजुराबाई अमझरे हीचा विवाह बुलडाणा जिल्हय़ातील संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथे झाला होता. सासरी न पटल्यामुळे ती वडिलांकडे नागद येथे राहावयास आली. महादेव भाणगे यांचा मुलगा जगदेव भाणगे हा त्यांची देखभाल करत नव्हता. त्यामुळे महादेव भाणगे यांनी त्यांच्या मालकीची साडेतीन एकर शेती व राहते घर मुलगी मंजुराबाई अमझरे यांच्या नावे करून दिली. कालांतराने त्यांचा मृत्यू झाल्यानंतर मंजुराबाई यांनी वडिलांचे घर विक्रीस काढले; परंतु जगदेव भाणगे याचा त्याला विरोध होता. यावरून त्यांचा मंजुराबाईसोबत वाद झाला. त्यानंतर २७ जूनच्या रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास मंजुराबाई ही तिच्या अंगणात झोपली असता, जगदेव महादेव भाणगे, देविदास ऊर्फ अंबादास जगदेव भाणगे (३५), ज्ञानेश्वर जगदेव भाणगे (३१) व प्रकाश जगदेव भाणगे (१८) यांनी संगनमत करून लोखंडी रॉड, सब्बल व काठय़ांनी मारहाण केली. यात मंजुराबाई गंभीर जखमी झाली. यावेळी तिच्या मदतीसाठी आलेली बहीण पार्वताबाई पारिसे हिलाही आरोपींनी मारहाण केली. या दोघींनाही उपचारासाठी अकोला येथील सवरेपचार रुग्णालयात नेत असताना वाटेतच मंजुराबाईचा मृत्यू झाला. तर पार्वताबाईवर उपचार सुरू आहेत. मंजुराबाईचे जावई नागोराव कुरवाडे यांनी उरळ पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून उपरोक्त आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३0२, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार आत्माराम इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली संजय भंडारी, अशोक चाटी, विजय गव्हाणकर, गणेश गावंडे करीत आहेत.
भावाने केली बहिणीची हत्या
By admin | Published: June 29, 2014 12:34 AM