खरब नवले येथील गट क्रमांक ३१ मधील साडेआठ एकर शेती ज्योतीराम शंकर वानखडे यांच्या मालकीची होती. दिनांक १३ ऑक्टोबर २०१७ रोजी ज्योतीराम वानखडे वणी रंभापूर येथे मरण पावले. त्यांना चार मुली, एक मुलगा आणि पत्नी असे एकूण सहा वारस आहेत.
मुलगा दादाराव याने चार बहिणींना डावलून खरब नवले येथील तत्कालीन तलाठी आणि मंडल अधिकाऱ्याच्या संगनमताने खोटा फेरफार तयार करून घेतला. फेरफार क्र. १९४ नुसार स्व. ज्योतीराम वानखडे यांच्या शेतीला फक्त मुलगा दादाराव व पत्नी कौसल्याबाई वारस झाले. भावाने फसवणूक केल्याची बाब चारही बहिणींच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी, मूर्तिजापूर उपविभागीय दंडाधिकारी अभयसिंह मोहिते यांच्या न्यायालयात खटला दाखल केला. अर्जदार निर्मला रुपराव आठवले, पुष्पा रामदास गवई, प्रमिला दुर्योधन इंगळे, सुनीता विनोद जवंजाळ यांनी ॲड. कनिष्क जगताप यांच्या मार्फत दावा दाखल केला. या खटल्यात प्रतिवादी व गैरअर्जदार तलाठी मौजे खरब नवले, मंडल अधिकारी साझा हेंडज, मुलगा दादाराव, आई कौसल्याबाई यांना करण्यात आले. उपविभागीय दंडाधिकारी न्यायालयात सुनावणी झाली. यात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६चे कलम २४७ प्रमाणे निकाल देण्यात आला. संगनमताने तयार केलेला खोटा फेरफार रद्द करण्याचा आदेश देण्यात आला. तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांना न्यायालयाने फटकारत, कायदेशीर वारस प्रमाणपत्रानुसार नोंद घेण्याची कार्यवाही करण्यात आली. या प्रकरणात बहिणींच्यावतीने ॲड. कनिष्क जगताप, ॲड. अमोल चक्रे यांनी काम पाहिले.