अमरावती : जुन्या वैमनस्यातून तरुणाची चाकुने गळा चिरून त्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना जेवडनगरात बुधवारी रात्री १०.१५ वाजताच्या सुमारास घडली.
पोलीस सूत्रानुसार, विवेक ऊर्फ गोलू विलास चोपकर (२३, रा. जेवडनगर), असे मृताचे नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी अजय गणेश यादव (३२), रोहित अशोक यादव (१९, दोन्ही रा. जेवडनगर) यांना अटक केली, तर जय कडू व एक अल्पवयीन पसार झाला. चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला असून, पसार आरोपीचा शोध पोलीस घेत आहे.
मृत विवेक हा बुधवारी जेवडनगर परिसरातील इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याजवळ काही मित्रांसोबत उभा होता. दरम्यान जुन्या वैमनस्यातून आरोपींनी संगनमत करून विवेक ऊर्फ गोलूवर धारदार शस्राने हल्ला केला. त्यामुळे गोलूच्या गळ्यातून अतिरक्तस्राव सुरू झाला. हा हल्ला झाल्यानंतर गोलुने गळ्यावरील जखम घट्ट धरून घराकडे धाव घेतली. घटनास्ळापासून त्याच्या घरापर्यंत रक्ताचा सडा पडला होता. त्याला काही नागरिकांनी उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. परंतु वाटेतच त्याचा मृत्यू झाला. माहिती मिळताच राजापेठ पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृताच्या शेजारी राहणारे फिर्यादी सतीश रामभाऊ पालवे (३२, रा . जेवडनगर) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३०२, ३०७, ३४ अन्यवे गुन्हा नोंदविला. पुढील तपास ठाणेदार किशोर शेळके करीत आहेत.
बॉक्स
मृतावरसुद्धा अनेक गुन्हे
आरोपी यादवविरुद्ध फ्रेजरपुरा ठाण्यात यापुर्वी गुन्हा दाखल होता. तसेच मृत गोलूवरदेखील राजापेठ व फ्रेजरपुरा ठाण्यात अनेक गुन्हे दाखल होते. त्यामुळे पोलिसांनी त्याला एक वर्षाकरिता शहर हद्दीतून तडीपार केले होते. परंतु विभागीय आयुक्तांनी तडीपारीच्या आदेशाला पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली होती. त्यामुळे मृत तडीपार असतानाही शहरात आल्याची माहिती राजापेठ पोलिसांनी दिली.