अकोला : भारत संचार निगम लिमिटेडची भूमिगत केबल तोडून चोरट्यांनी पळविली आहे. विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर केबल पळविल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचे इंटरनेट नेटवर्क विस्कळीत झाले आहे. केबल पळविल्याने बीएसएनएल विभागाचे साडेचार लाख रुपयांचे नुकसान झाले असून, याप्रकरणी सीटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली गेली आहे.स्थानिक टिळक मार्गावरील सावतराम मिलच्या गेटसमोर अकोला महापालिकेच्या नालीचे खोदकाम सुरू आहे. हे काम सुरू असताना ‘बीएसएनएल’ची केबल उखडल्या गेली. त्यात २००,६००,१०००,१२०० पिअर उघडे पडले. उघडी पडलेली ३० मीटर केबल चोरट्यांनी कापून येथून पळविली. तीस मीटरची मोठी केबल पळविल्या गेल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयासोबतच, खोलेश्वर, नवरंग सोसायटी, गीतानगर, आदी परिसरातील इंटरनेट नेटवर्क आणि टेलिफोन बंद पडले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सेवा विस्कळीत झाल्याने प्रशासनाच्या रोषाचा सामना ‘बीएसएनएल’च्या अधिकाऱ्यांना करावा लागतो आहे. दरम्यान नेटवर्कची पर्यायी व्यवस्था दोन्ही कार्यालयातर्फे शोधली जात आहे. विस्कळीत झालेली सेवा पूर्ववत करण्यासाठी बीएसएनएलला साडेचार लाख रुपयांचा खर्च आहे. उघड्या पडलेल्या केबल आणि होत असलेल्या चोरीमुळे ‘बीएसएनएल’चे कनिष्ठ दूरसंचार अधिकारी बीपीन तेलगोटे यांनी सीटी कोतवाली पोलीस ठाण्यात याप्रकरणी १७ आॅक्टोबर २०१९ रोजी तक्रार नोंदविली आहे. आता पोलीस यंत्रणा ३० मीटर केबल पळविणाऱ्यांचा शोध घेत आहे. सोबतच या केबल मार्गावर पोलिसांना गस्त घालण्याची वेळ आली आहे. या चोरीप्रकरणी काही संशयीतांचे फोटो ‘बीएसएनएल’च्या अधिकाºयांनी पोलिसांना तपासासाठी दिले आहे. विस्कळीत झालेली नेटवर्क व्यवस्था पूर्ववत सुरळीत करण्यासाठी ‘बीएसएनएल’ला किमान १५ दिवसांचा अवधी लागणार असल्याचे अधिकाºयांचे म्हणने आहे.