- संजय खांडेकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : भारत संचार निगम लिमिटेडच्या विपणन शाखेच्यावतीने आता बेरोजगार आणि पदवीधरांना भागीदारीची संधी दिली जात असून, तशा प्रकारचे आवाहन आता दूरसंचार विभागाच्या सहायक महाप्रबंधकांकडून केले जात आहे.बीएसएनएल ही शासकीय दूरसंचार कंपनी असून, गत काही वर्षांपासून सातत्याने तोट्यात जात आहे. दरम्यान, काही खाजगी कंपन्या जनमानसात स्थान मिळवित आहेत. जनमानसातील आपले पूर्ववत वैभव प्राप्त करण्यासाठी आता ‘बीएसएनएल’ने धोरणात बदल करीत सेवांचे जाळे पसरविण्यासाठी आता बेरोजगार आणि पदवीधरांचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी भागीदार करण्याचे आवाहन केले जात असून, खाजगी व्यक्ती, स्थानिक उद्योजक, बेरोजगार, सेवानिवृत्त कर्मचारी यांची मदत घेत आहे. व्यवसायात या घटकांना सोबत घेत उत्पन्नाचा मोठा स्रोत निर्माण करण्याचा प्रयत्न बीएसएनएल करीत आहे. गत काही वर्षांत दूरसंचार क्षेत्रात विविध खाजगी कंपन्यांचा शिरकाव झाल्याने ‘बीएसएनएल’च्या सेवेत मरगळ आली होती. खाजगी कंपन्यांनी विकासाचा मोठा पल्ला गाठल्यानंतर आता शासकीय यंत्रणेला जाग आली असून, आता शेवटचे आचके लागत असताना बीएसएनएल कंपनी सावरण्याचा हा शेवटचा प्रयोग सुरू झाला आहे. खाजगी दूरसंचार सेवेला टक्कर देण्यासाठी आता बीएसएनएलने खाजगी व्यक्तींमार्फत सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सेवादात्यांना घसघशीत आर्थिक लाभ देण्याच्या योजना आखल्या आहेत. त्यासाठी खाजगी व्यक्ती, स्थानिक उद्योजक, बेरोजगार, सेवानिवृत्त कर्मचारी आणि पदवीधरांना भागीदार म्हणून संधी दिली जात आहे.
‘बीएसएनएल’ देणार बेरोजगार, पदवीधरांना भागीदारीची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 3:21 PM