अकोला-मेडशी द्रुतगती महामार्गाचे काम प्रगतिपथावर आहे. त्यामुळे दरम्यान रोड लगत असणारी बीएसएनएल लँडलाईनची वायर सातत्याने रस्त्याच्या कामामुळे तुटत राहते. त्यामुळे शहरातील बँका, शासकीय कार्यालयातील कामकाज, महासेवा केंद्र, सीएससी सेंटर विविध प्रकारच्या ऑनलाईन सर्व्हिसेस ठप्प पडतात. त्यामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागातून येणाऱ्या तथा शहरातील नागरिकांना शारीरिक-मानसिक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागताे. कामकाज प्रभावित होते. याकडे बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष हाेत आहे. गत सहा दिवसांपासून ठप्प असलेली बीएसएनएलची सेवा रविवारी सुरू करण्यात आली. तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपरिषद तथा ग्रामपंचायत आदी ठिकाणचे कामकाज ठप्प झाल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. पातूर शहरामध्ये रविवारी व्होडाफोन, आयडिया कंपनीचे नेटवर्क दिवसभर बंद होते. त्यामुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागला. पातूर शहरात विविध मोबाईल कंपन्यांचे नेटवर्क अपुऱ्या टाॅवर संख्येमुळे कमजोर आहे. त्यामुळे डाऊनलोडिंग करणे, विविध वेबसाईट एक्सेस करणे नेटवर्कअभावी शक्य होत नाही. त्यामुळे पातूर शहरातील विविध कंपन्यांच्या बंद पडलेल्या टाॅवर कामाला सुरुवात झाल्याशिवाय नेटवर्कमध्ये सुधारणा होणे शक्य नसल्याचे ग्राहकांनी बोलून दाखवले.
बीएसएनएलची सेवा सुरळीत, व्होडाफाेन, आयडियाची सेवा ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 4:20 AM