लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महाराष्ट्रात बहुजन समाज पार्टीची झालेली पीछेहाट थांबवून पक्षसंघटन मजबूत करतानाच पक्षाला प्रगतीपथावर नेण्यासाठी पक्षाच्यावतीने राज्यभरात भाईचारा संमेलन घेणार असल्याची माहिती नवनियुक्त प्रदेश अध्यक्ष सुरेश साखरे यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. राज्यात बसपाला आलेली मरगळ झटकून पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांनी राज्यात पक्ष वाढविण्याची जबाबदारी सुरेश साखरे यांच्या खांद्यावर टाकली आहे. अलिकडेच महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्ती झाल्यापासून साखरे हे राज्यभरात दौरे काढून पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देत आहेत. याच दौर्याचा भाग म्हणून अकोला जिल्हय़ाच्या दौर्यावर आलेल्या सुरेश साखरे यांनी शुक्रवारी येथील शासकीय विश्राम गृहात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका विशद केली. आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुका लक्षात घेता राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांनी राज्यात बसपाला मजबूत करण्याचा आदेश दिला आहे. त्यांच्या आदेशान्वये राज्यातील पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी आपण राज्यभरात ५ मार्चपर्यंत दौरे करणार आहोत. त्यानंतर ठिकठिकाणी भाईचारा संमेलन घेणार असल्याचे सुरेश साखरे यांनी सांगितले. ओबीसी, मुस्लीम व दलित समुदायाची मोट बांधून पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये यश मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही यावेळी साखरे यांनी सांगितले. राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यात आतापर्यंतची काँग्रेस व भाजप सरकार सपशेल अपयशी ठरल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. पत्रकार परिषदेला महाराष्ट्र प्रभारी संदीप ताजने, प्रदेश उपाध्यक्ष केशनाजी बेले, प्रदेश सचिव राजीव बसवनाथे, झोन प्रभारी चेतन पवार, जिल्हा अध्यक्ष विजय येलकर, सचिव सुधीर तेलगोटे, जिल्हा प्रभारी बी.सी. कांबळे, राजकुमार वाघमारे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
स्वतंत्र विदर्भासाठी बसपा आग्रहीभाजपने सत्तेत येताना वेगळय़ा विदर्भाचे गाजर दाखविले होते. परंतु, सत्तेत आल्यानंतर या मुद्यावर कोणतेही ठोस पाऊल त्या पक्षाने उचलले नसल्याने विदर्भवाद्यांची निराशा झाल्याचे सांगत बसपा स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी आग्रही असल्याचे साखरे यांनी स्पष्ट केले. खांदेश, विदर्भ, मराठवाडा व कोकण अशा चार राज्यांमध्ये महाराष्ट्राची विभागणी व्हावी, अशी बसपाची भूमिका असल्याचेही साखरे यांनी सांगितले.