अकोला: पेरणीपूर्व कापूस बियाण्यांच्या तपासणीत सात नमुने निकृष्ट असल्याचा अहवाल नागपूर येथील बीज परीक्षण प्रयोगशाळेने दिला आहे. पाच कंपन्यांच्या बियाण्यांमध्ये बीटी जिन्सचे प्रमाण, रेफ्युजीचे प्रमाण कमी असल्याने नमुने रद्द ठरले आहेत. त्या बियाणे उत्पादक कंपन्यांना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने नोटीस बजावली आहे. शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या बियाण्यांची खातरजमा करून सावधानता बाळगावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.बोंडअळी रोखण्यासाठी बीटी कापूस बियाण्यांची पेरणीपूर्वीच काटेकोर तपासणी करण्याचा आदेश शासनाने आधीच दिला. त्यानुसार मे महिन्यात बीटी कापूस बियाण्यांचे नमुने घेण्यात आले. त्यांची तपासणी नागपूर येथील बीज परीक्षण प्रयोगशाळेत करण्यात आली. त्यामध्ये पाच बियाणे उत्पादक कंपन्यांच्या बियाण्यांचे सात नमुने अपयशी ठरले आहेत. बियाणे नमुन्यात बीटी जिन्सचे प्रमाण कमी आढळल्याने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मोहीम अधिकारी मिलिंद जंजाळ यांनी सात दिवसात कंपनीला खुलासा मागवला आहे.- बियाणे निकृष्ट आढळलेले उत्पादककापसाचे बियाणे बोगस आढलेल्या उत्पादकांमध्ये बायर बायोसायन्स कंपनीचे २ नमुने, सनग्रो सीड्स लि. चा-१, साउदर्न अॅग्रो सायन्स-२, नर्मदा सागर-१, श्रीराम बायोसिडस-१ नमुन्याचा समावेश आहे.- बोंडअळीचा धोकागेल्या दोन वर्षात राज्यभरात कापूस पिकावर बोंडअळीचा प्रकोप झाला. पीक नुकसानासाठी शासनाने घोषित केलेली मदत शेतकऱ्यांच्या पदरात पडली नाही. त्यावेळी शासनाने बियाणे कंपन्या, विमा कंपन्या आणि शासनाची मिळून हेक्टरी ३६ हजार रुपये देत असल्याचेही जाहीर केले. त्यानुसार बियाणे कंपन्यांना नुकसान भरपाईसाठी बाध्य करण्यात आले. कंपन्यांनी शासनाच्या या प्रयत्नाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या होत्या, हे विशेष.