व्हाॅल्व्ह दुरुस्ती आटाेपली !
अकाेला : शहरवासीयांना पाणीपुरवठा करणाऱ्या खदान पाेलीस स्टेशनजवळील मुख्य जलवाहिनीवरील व्हाॅल्व्ह नादुरुस्त झाला हाेता. मागील दाेन दिवसांपासून मनपाचा जलप्रदाय विभाग व्हाॅल्व्ह दुरुस्तीच्या कामाला लागला हाेता. व्हाॅल्व्ह दुरुस्तीचे काम आटाेपल्यानंतर बुधवारी या जलवाहिनीवरून पाणीपुरवठ्याची चाचणी घेण्यात आली.
खडकीमध्ये घाणीचे साम्राज्य
अकाेला : मनपा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक २० मधील खडकी, जिल्हा परिषद काॅलनीमध्ये मूलभूत सुविधांचा बाेजवारा उडाला आहे. नाले, गटारांची नियमीत साफसफाई हाेत नसल्यामुळे डासांची पैदास वाढली असून, नागरिक त्रस्त झाले आहेत. याप्रकाराकडे मनपाच्या आराेग्य निरीक्षकांनी लक्ष देण्याची मागणी हाेत आहे.
संत तुकाराम चौकात भाजीविक्रेत्यांचा ठिय्या
अकाेला : शहरातील प्रमुख रस्त्यांलगत व चाैकांमध्ये भाजी, फळविक्रेत्यांनी अतिक्रमण थाटल्याचे दिसून येत आहे. संत तुकाराम चाैकात भाजीविक्रेत्यांनी बाजार मांडला आहे. येवता, विझाेरा, कानशिवनी येथून प्रवासी व अवजड वाहतूक मलकापूर भागातून शहरात दाखल हाेत असल्याने याठिकाणी वाहतुकीची काेंडी हाेत आहे.
बापूनगरमध्ये सुविधांचा अभाव
अकाेला : अकाेटफैल भागातील बापूनगर व रेल्वे क्वाॅर्टरमध्ये मागील काही दिवसांपासून मूलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. या परिसरात मनपाचे साफसफाई कर्मचारी तसेच नगरसेवक फिरकत नसल्यामुळे रहिवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
‘मच्छी मार्केटमध्ये सुविधा पुरवा !’
अकाेला : अकाेटफैल परिसरातील मुख्य रस्त्यांलगत उघड्यांवर मांस विक्रीची दुकाने थाटण्यात आली आहेत. या भागातील मच्छी मार्केटमध्ये जागेचा अभाव असल्यामुळे व्यावसायिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागताे. त्यामुळे प्रशस्त जागा उपलब्ध करून देण्यासाेबतच मच्छी मार्केटमध्ये सुविधा देण्याची मागणी हाेत आहे.
हिंगणा रस्त्याची दुरवस्था
अकाेला : मनपा क्षेत्रातील हिंगणा रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली आहे. या परिसरातील रहिवाशांना शहरात दाखल हाेण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्यामुळे त्यांना अडचणीला सामाेरे जावे लागत आहे. वाशिम मार्गावरील अवजड वाहनांमुळे हिंगणा येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून, याभागात पथदिव्यांची सुविधा नाही.
जलवाहिनीच्या कामाला वेग
अकाेला : प्रभाग क्रमांक ८ अंतर्गत येणाऱ्या हद्दवाढ क्षेत्रातील डाबकी येथे नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, या उद्देशातून मनपा प्रशासनाच्या वतीने मुख्य जलवाहिनीचे जाळे टाकण्याचे काम प्रगतिपथावर आहे. जलवाहिनीला रेल्वे रुळाचा अडसर दूर झाला असून, मनपाने रेल्वे प्रशासनाकडून परवानगी घेतल्यानंतर कामाला सुरुवात केली आहे.
लुंबिनीनगरमध्ये नाल्या तुंबल्या
अकाेला : मनपाच्या बांधकाम विभागाने डाबकीराेड परिसरातील लुंबिनीनगरमध्ये नाल्यांची सुविधा उपलब्ध न केल्यामुळे या भागात सांडपाण्याची समस्या निर्माण झाली आहे. रस्त्यांवर सांडपाणी साचल्यामुळे त्यातून वाट काढताना रहिवाशांच्या नाकीनव आले आहेत. ही समस्या नगरसेवकांसह मनपाने निकाली काढण्याची मागणी हाेत आहे.