अकोला, दि. २५- घरातील पुरुषांनी महिलांचा आदर व सन्मान केला पाहिजे. घरातील महिला शौचासाठी बाहेर जाणे ही चांगली बाब नाही. महिलांचा आत्मसन्मान व त्यांचा स्वाभिमान जपण्यासाठी घराघरांत वैयक्तिक शौचालय बांधले पाहिजे, असे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी मूर्तिजापूर तालुक्यातील निंभा येथील ग्रामस्थांना रविवारी केले. गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी मार्गदर्शन व्हावे, या उद्देशाने निंभा येथे रविवार, २५ सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत व विदर्भ फार्र्मस क्लब निंभा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच जयश्री विनोद देशमुख होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे, जि.प. सदस्य सम्राट डोंगरदिवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सर्मथ शेवाळे, उपविभागीय अधिकारी सैंदाने, तहसीलदार गजेंद्र मालठाणे, सहायक गटविकास अधिकारी डॉ. व्ही. व्ही. वानखडे व जितेंद्र अंबास्ता आदी उपस्थित होते. आदर्श गाव संकल्पनेबाबत बोलताना जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, की गावाची आदर्श गाव म्हणून ओळख व्हावी, यासाठी पहिली पायरी म्हणजे गाव हगणदरीमुक्त करणे होय. असे सकारात्मक बदल ह्यमाझे गाव-आपले गावह्ण या जाणिवेतून होत असतात. त्यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्नरत असावे, असे ते म्हणाले. यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी अरुण विधळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सर्मथ शेवाळे, सम्राट डोंगरदिवे यांनीही मनोगत व्यक्त केले. जिल्हाधिकार्यांनी महिला व मुलांच्या सहकार्याने हात धुण्याचे प्रात्यक्षिक दाखविले. सर्मथ शेवाळे यांनी ग्रामस्थांना स्वच्छतेची शपथ दिली. प्रास्ताविक जितेंद्र अंबास्ता यांनी, तर संचालन शाहू भगत यांनी केले.
आत्मसन्मानासाठी शौचालय बांधा!
By admin | Published: September 26, 2016 3:15 AM