नितीन गव्हाळे
अकोला: स्थानिक बिल्डर गोपाल साेमाणी यांचा मृतदेह ३ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास डाबकी रोड रेल्वे गेट जवळील रेल्वे मार्गावर कटलेल्या अवस्थेत आढळून आल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. रात्री १०. ३० वाजताच्या सुमारास डाबकी रोड पोलिसांसह उरळ पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. सोमाणी यांनी शनिवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याची नोंद डाबकी रोड पोलिसांनी रात्री उशिरा केली. कुटूंबियांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असून, डाबकी पोलीस त्या दिशेने तपास करीत आहेत.
येथील बिल्डर गोपाल सोमाणी यांचा मृतदेह कटलेल्या अवस्थेत डाबकी रोड पोलीस ठाण्यातर्गंत येणाऱ्या रेल्वेमार्गावर शनिवारी रात्री आढळून आला. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. रेल्वे चालकाने रेल्वे कंट्रोलला शनिवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास सोमाणी यांनी रेल्वेगाडीसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती दिली. त्यानुसार डाबकी रोड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. रेल्वे मार्गापासून काही अंतरावर त्यांची दुचाकी बेवारस आढळून आली. गोपाल सोमाणी हे बांधकाम व्यवसायाशी संबधित होते. त्यामुळे त्यांच्याकडे अनेक रोख रक्कम असायची. त्यांची हत्या करून त्यांचा मृतदेह रेल्वे मार्गावर टाकून दिल्याचा संशय सोमाणी यांच्या कुटूंबियांनी व्यक्त केला. त्यामुळे पोलीस अधिक तपास करणार आहेत.
बिल्डर गोपाल सोमाणी यांनी रेल्वेसमोर आत्महत्या केल्याची तक्रार रेल्वेगाडी चालकाने दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. सध्यातरी काही घातपात वाटत नाही. तरीही पोलीस सर्व बाबींचा तपास करतील.-शिरीष खंडारे, पोलीस निरीक्षक, डाबकी रोड पोलीस स्टेशन